एका महिन्यात इंग्लंडला सलग तिसरा धक्का : टी-20 लीगमध्ये मात्र खेळत राहणार असल्याचे केले स्पष्ट
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंड क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंची निवृत्ती घेण्याची मालिका सुरुच आहे. अवघ्या चारच दिवसांपूर्वी समाप्त झालेल्या अॅशेस मालिकेनंतर दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड व अष्टपैलू मोईन अली यांनी निवृत्ती जाहीर केली. यानंतर शुक्रवारी सलामीवीर व 2022 टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य अॅलेक्स हेल्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. मात्र, आपण टी-20 लीग खेळत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.
मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. टेस्ट, वनडे आणि टी 20 अशा तिन्ही फॉर्मेटमधील एकूण 156 सामन्यात देशाचं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली, ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे. या दरम्यान असंख्य आठवणी सोबत आहेत, अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच 2022 मधील वर्ल्ड कपचा अंतिम सामना हा माझ्यासाठी अखेरचा सामना ठरला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. इंग्लंडसाठी खेळताना कारकिर्दीत अनेक चढउतार आले. हा एक अविस्मरणीय असा प्रवास राहिला आहे. मला या चढउतारात माझ्या सहकाऱ्यांन, मित्रांनी, कुटुंबियांची आणि समर्थकांची साथ मिळाली. या सर्वांनीच मला पाठिंबा दिला, अशा शब्दात हेल्सने सहकारी, कुटुंबियांसह मित्रांचेही आभार मानले.
हेल्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
हेल्सने इंग्लंडकडून खेळताना 11 कसोटी, 70 वनडे आणि 75 टी 20 अशा एकूण 156 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. दरम्यान, 34 वर्षीय फलंदाजाने ऑगस्ट 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तीनही फॉरमॅटमध्ये 156 सामने खेळले. यामध्ये सात शतकांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5066 धावा केल्या. विशेष म्हणजे, टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो इंग्लंडचा पहिला क्रिकेटपटू होता, हा पराक्रम त्याने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध केला होता. मागील टी-20 वर्ल्डकपमध्ये हेल्सने इंग्लंडच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती.









