पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंड विजयी, नायजेरीया, द. आफ्रिका यांचे आव्हान समाप्त
ब्रिस्बेन, सिडनी / वृत्तसंस्था
2023 फिफा महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत इंग्लंड आणि नेदरलँडस् यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. रविवारी झालेल्या सामन्यात नेदरलँडस्ने द. आफ्रिकेचा 2-0 तर इंग्लंडने नायजेरीयाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला.
या स्पर्धेत स्पेन आणि जपान यांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बलाढ्या अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे. स्पेन आणि नेदरलँडस् यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे.
सोमवारी इंग्लंड आणि नायजेरीया यांच्यातील सामना निर्धारित आणि त्यानंतर जादा वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिल्याने पंचानी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडतर्फे 4 तर नायजेरीयातर्फे 2 गोल नेंदवले गेले. पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडची क्लो केली हिने दर्जेदार कामगिरी करत अचूक गोल नोंदवित युरोपियन चॅम्पियन इंग्लंडला शेवटच्या 8 संघात स्थान मिळवून देण्यात आपले योगदान दिले. आता कोलंबिया आणि जमैका यांच्यापैकी एका संघाबरोबर इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.
सोमवारच्या सामन्यात निर्धारित कालावधीत इंग्लंडच्या खेळाडूंना नायजेरीयाकडून कडवे आव्हान मिळाले. इंग्लंडचे खेळाडू या कालावधीत गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. इंग्लंड संघातील आघाडी फळीत खेळणारी लॉरेन जेम्स हिला पंचांनी लाल कार्ड दाखविल्याने तिला मैदानाबाहेर जावे लागले. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीत झालेल्या सामन्यामध्ये जेम्सने 3 गोल नोंदविले होते. इंग्लंडला जेम्सची उणीव जादा वेळेत चांगलीच भासली. 87 व्या मिनिटाला जेम्स मैदानाबाहेर गेल्याने इंग्लंड संघाला पंचांनी दिलेल्या जादा वेळेत 10 खेळाडूंशी नायजेरीयाशी मुकाबला करावा लागला. जादा कालावधीमध्ये दोन्ही संघांकडून आक्रमक आणि जलद खेळावर अधिक भर दिल्याने पुन्हा गोलकोंडी कायम राहिली. नायजेरियाला शेवटच्या 10 मिनिटात गोल करण्याची संधी मिळाली होती. पण त्यांचे फटके अचूक नव्हते.
पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडच्या जॉर्जिया स्टेनवेने मारलेला फटका गोलपोस्टच्या बाहेरून गेला. बेथ इंग्लंडने तसेच रॅचेल डेली आणि अॅलेक्स ग्रिनवूड यांनी पेनल्टीवर गोल नोंदविले. क्लो केलीने इंग्लंडचा चौथा गोल नोंदविला. नायजेरीयातर्फे पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन गोल नोंदविले गेले. तर त्यांचे तीन फटके इंग्लंडच्या गोलरक्षकाने थोपविल्याने नायजेरीयाचे आव्हान संपुष्टात आले. लंडनमध्ये गेल्यावर्षी क्लो केलीने इंग्लंडला युरोपियन चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धा जिंकून दिली होती.
या स्पर्धेत नायजेरीयाने प्राथमिक फेरीतील सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा 3-2 अशा गोल फरकाने पराभव केला होता. इंग्लंड आणि नायजेरीया यांच्यातील सामन्यात निर्धारित कालावधीतील सामन्याच्या पूर्वार्धात इंग्लंडने 173 तर नायजेरीयाने 83 पासेस नोंदविले. याच कालावधीत नायजेरीयाने इंग्लंडच्या गोलपोस्टच्या दिशेने 8 फटके मारले. तर इंग्लंडला तीन फटके मारण्याची संधी मिळाली. दोन्ही संघांना निर्धारित वेळेत गोल नोंदविता आला आहे.
नेदरलँड्सचा एकतर्फी विजय
या स्पर्धेतील रविवारी सिडनीत झालेल्या सामन्यात बलाढ्या नेदरलँडस्ने द. आफ्रिकेचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करत शेवटच्या 8 संघात स्थान मिळविले. आता स्पेन आणि नेदरलँडस् यांच्यात उपांत्पपूर्व फेरीचा सामना होईल. या सामन्याला सुमारे 40 हजार शौकीन उपस्थित होते. 2019 साली या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या नेदरलँडस्ला पूर्वार्धात द. आफ्रिकेकडून बऱ्यापैकी प्रतिकार झाला. नेदरलँडस्च्या गोलरक्षकाने भक्कम गोलरक्षण करून आफ्रिकेच्या चाली थोपविल्या. सामन्यातील नवव्या मिनिटाला नेदरलँडस्चे खाते जील रूर्डने उघडले. नेदरलँडस्ने या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच बाद फेरी गाठली आहे. सामन्याच्या उत्तरार्धात नेदरलँडस्चा दुसरा गोल लिनेथ बेरेनस्टीनने नेंदविला. नेदरलँडस् आणि स्पेन यांच्यातील उपांत्पपूर्व फेरीचा सामना येत्या शुक्रवारी खेळविला जाणार आहे.
फिफाच्या मानांकनात 54 व्या स्थानावरील द. आफ्रिकेने या सामन्यात नेदरलँडस्ला बऱ्यापैकी प्रतिकार केला. मात्र त्यांना शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. या स्पर्धेत द. आफ्रिकेने आपला पहिला विजय नेंदविताना इटलीचा पराभव केला होता. नेदरलँडस्ची बचाव फळी भक्कम असल्याने तसेच त्यांच्या खेळाडूमध्ये योग्य समन्वय साधला गेल्याने द. आफ्रिकेला शेवटच्या 10 मिनिटात किमान 4 वेळा गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारूनही गोल करता आला नाही.
सामन्याचे निकाल
इंग्लंड वि. वि. नायजेरीया
पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2
नेदरलँडस् वि. वि. द. आफ्रिका









