दुसरी कसोटी, अॅटकिनसनची हॅट्ट्रीक, इंग्लंड दु. डाव 5 बाद 378
वृत्तसंस्था / वेलिंग्टन
येथे सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडचा संघ मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात 5 बाद 378 धावा जमवित न्यूझीलंडवर 533 धावांची भक्कम आघाडी मिळविली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस अॅटकिनसनने हॅट्ट्रीक साधली. या सामन्यात इंग्लंडने अनेक विक्रम नोंदविले. तीन सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने पहिली कसोटी जिंकून यापूर्वीच न्यूझीलंडवर आघाडी घेतली आहे. आता इंग्लंडचा संघ मालिका विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.
या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 280 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा पहिला डाव 125 धावांत गुंडाळाला गेला. इंग्लंडने न्यूझीलंडवर पहिल्या डावात 155 धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात भक्कम फलंदाजी करत 76 षटकात 5 बाद 278 धावा जमवित न्यूझीलंडवर 533 धावांची आघाडी मिळविली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात डकेट, बेथेल, ब्रुक आणि रुट यांनी अर्धशतके झळकविली.
न्यूझीलंडने 5 बाद 86 या धावसंख्येवरुन शनिवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पण त्यांचे शेवटचे पाच गडी 39 धावांत तंबूत परतले. अॅटकिनसन आणि कार्से न्यूझीलंडचे कर्दंनकाळ ठरले. अॅटकिनसनने 31 धावांत 4 तर कार्सेने 46 धावांत 4 तसेच वोक्स आणि स्टोक्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडने दुसऱ्या डावाला दमदार सुरुवात केली. उपाहारापर्यंत त्यांनी 15 षटकात 1 बाद 82 धावा जमविल्या.
शतकी भागिदारी
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या षटकात सलामीचा क्रॉले हेन्रीच्या गोलंदाजीवर 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर डकेट आणि बेथेल यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 187 धावांची भागिदारी केली. बेथेलने 52 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह तर डकेटने 59 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले. या जोडीने 167 चेंडूत दीड शतकी भागिदारी केली. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये इंग्लंडचे दोन गडी बाद झाले. चहापानावेळी इंग्लंडने 43 षटकात 3 बाद 215 धावा जमविल्या होत्या. या दुसऱ्या सत्रामध्ये साऊदीने बेथेलला झेलबाद केले. त्याने 118 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 96 धावा झळकविल्या. बेथेलचे शतक 4 धावांनी हुकले. बेथेल बाद झाल्यानंतर डकेटही साऊदीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 112 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 92 धावा झळकविल्या. डकेटचे शतक 8 धावांनी हुकले. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये इंग्लंडने दोन गडी गमविताना 133 धावांची भग घातली.
खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये इंग्लंडच्या रुट आणि ब्रुक यांनी चौथ्या गड्यासाठी 95 धावांची भागिदारी केली. फिलीपने ब्रुकला झेलबाद केले. त्याने 61 चेंडूत 5 चौकारांसह 55 धावा जमविल्या. ओली पॉप हेन्रीच्या गोलंदाजीवर 10 धावांवर झेलबाद झाला. रुटने 76 चेंडूत 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले. रुट आणि स्टोक्स यांनी दिवसअखेर सहाव्या गड्यासाठी अभेद्य 51 धावांची भागिदारी केली. रुट 5 चौकारांसह 73 तर स्टोक्स 2 षटकार आणि 1 चौकारांसह 35 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडतर्फे साऊदी आणि हेन्री यांनी प्रत्येकी 2 तर फिलीप्सने 1 गडी बाद केला.
अॅटकिनसनची हॅट्ट्रीक
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस अॅटकिनसनने न्यूझीलंड बरोबरच्या दुसऱ्या कसोटीत शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी शानदार हॅट्ट्रीक नोंदविली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील 35 व्या षटकात अॅटकिनसन न्यूझीलंडच्या नाथन स्मिथ, मॅट हेन्री आणि टीम साऊदी यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद केले. 2017 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रीय नोंदविणारा अॅटकिनसन हा पहिला इंग्लंडचा गोलंदाज आहे. तत्पूर्वी म्हणजे 2017 साली द. आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडच्या मोईन अलीने हॅट्ट्रीक नोंदविली होती. तसेच 2014 साली लीडस् मैदानावर लंकेविरुद्धच्या कसोटीत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने हॅट्ट्रीक साधली होती. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक नोंदविणाऱ्या गोलंदाजांमध्ये 26 वर्षीय अॅटकिनसन हा इंग्लंडचा 14 वा गोलंदाज आहे. त्याच प्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये पंधरावी हॅट्ट्रीक साधणारा अॅटकिनसन हा इंग्लंडचा गोलंदाज ठरला आहे. पुरुषांच्या क्रिकेट कसोटीमध्ये आतापर्यंत 47 गोलंदाजांनी हॅट्ट्रीक नोंदविली आहे. अॅटकिनसनने गेल्या जुलै महिन्यात विंडीज विरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. त्या कसोटीत अॅटकिनसनने दोन्ही डावात प्रत्येकी 5 बळी मिळविले होते. त्या कसोटीत त्याने एकूण 12 गडी बाद केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये अॅटकिनसनने 10 सामन्यात 21.31 धावांच्या सरासरीने 47 बळी मिळविले आहेत.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प. डाव 54.4 षटकात सर्वबाद 280, न्यूझीलंड प. डाव 34.5 षटकात सर्वबाद 125 (विलियमसन 37, ब्लंडेल 16, फिलीप्स नाबाद 16, स्मिथ 14, लॅसम 17, कॉन्वे 11, अॅटकिनसन 4-31, कार्से 4- 46, वोक्स 1-26, स्टोक्स 1-21), इंग्लंड दु. डाव 76 षटकात 5 बाद 378 (डकेट 92, बेथेल 96, रुट खेळत आहे 73, ब्रुक 55, पॉप 10, स्टोक्स खेळत आहे 35, हेन्री 2-67, साऊदी 2-72, फिलीप्स 1-75)









