अब्रार अहमद पुन्हा प्रभावी, पाकचा पहिला डाव 202 धावात समाप्त
वृत्तसंस्था/ मुल्तान
येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर इंग्लंडने यजमान पाकवर 281 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. दिवसअखेर इंग्लंडने दुसऱया डावात 5 बाद 202 धावा जमविल्या. पाकच्या अब्रार अहमदने 81 धावात 3 गडी बाद केले.
या मालिकेत इंग्लंडने पहिला सामना जिंकून पाकवर यापूर्वीच आघाडी घेतली आहे. मुल्तानच्या दुसऱया सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 281 धावा आटोपल्यानंतर पाकने पहिल्या डावात 202 धावा जमविल्या. इंग्लंडला पहिल्या डावात 79 धावांची आघाडी मिळाली. पाकने 2 बाद 107 या धावसंख्येवरून शनिवारी खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे शेवटचे 8 गडी 95 धावात बाद झाले. पाकच्या पहिल्या डावात कर्णधार बाबर आझमने 95 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 75 तर शकीलने 10 चौकारांसह 63, फईम अश्रफने 4 चौकारांसह 22 धावा जमविल्या. शफीकने 14 तर मोहम्मद रिझवानने 10 धावा केल्या. इंग्लंडतर्फे जॅक लिच सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 98 धावात 4 गडी बाद केले. मार्क वूड आणि रुट यांनी प्रत्येकी 2 तसेच अँडरसन आणि रॉबिनसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
79 धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने आपल्या दुसऱया डावाला सुरुवात केली. पण अब्रार अहमदच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचे सुरुवातीचे दोन फलंदाज केवळ 25 धावात बाद झाले. सलामीचा क्रॉले एकेरी धाव घेण्याच्या नादात 3 धावांवर धावचीत झाला. अब्रार अहमदने त्याला धावचीत केले. त्यानंतर अब्रार अहमदने जॅक्सचा 4 धावांवर त्रिफळा उडविला. रुट आणि डकैट या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 54 धावांची भर घातली. अब्रार अहमदने रुटला शफीककरवी झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 21 धावा जमविल्या. रुट बाद झाल्यानंतर डकेट आणि ब्रुक यांनी चौथ्या गडय़ासाठी 68 धावांची भर घातली. अब्रार अहमदच्या इनस्विंगरवर डकेटचा त्रिफळा उडाला. त्याने 98 चेंडूत 6 चौकारांसह 79 धावा जमविल्या. ऑली पॉप 4 धावांवर धावचीत झाला. हॅरी ब्रुक 1 षटकार आणि 8 चौकारांसह 74 धावांवर तर कर्णधार स्टोक्स 16 धावांवर खेळत आहे. या जोडीने सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 47 धावांची भागीदारी केली आहे. पाकतर्फे अब्रार अहमदने 3 गडी बाद केले. इंग्लंडच्या पहिल्या डावात अब्रार अहमदने 7 बळी मिळविले होते. या कसोटीतील खेळाचे तीन दिवस बाकी असून इंग्लंडचे पारडे किंचित जड वाटते. शनिवारी खेळाच्या दुसऱया दिवशी गोलंदाजांनी एकूण 13 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव 51.4 षटकात सर्वबाद 281, पाक प. डाव 62.5 षटकात सर्वबाद 202 (बाबर आझम 75, शकील 63, अश्रफ 22, शफीक 14, लिच 4-98, मार्क वूड 2-40, रुट 2-23, अँडरसन 1-16, रॉबिन्सन 1-2), इंग्लंड दु. डाव 49 षटकात 5 बाद 202 (डकेट 79, रुट 21, ब्रुक खेळत आहे 74, स्टोक्स खेळत आहे 16, अब्रार अहमद 3-81).









