वृत्तसंस्था / नवी दिल्ली
30 सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने सुरू होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी येथे शुक्रवारी आयोजिलेल्या सरावाच्या विविध सामन्यांमध्ये पावसाचा बराच अडथळा आला. पण इंग्लंड आणि भारत अ संघाने प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील तसेच पाक आणि लंका यांच्यातील सामने पावसामुळे वाया गेले.
पहिल्या सरावाच्या सामन्यात इंग्लंडने यजमान भारताचा पराभव केला. या सामन्यात इंग्लंडने 50 षटकात 9 बाद 339 धावा जमविल्या होत्या. इंग्लंडची कर्णधार नॅट सिव्हेर ब्रंटने 105 चेंडूत नाबाद 122 धावांची खेळी केली. इमा लॅम्बने 81 धावा झोडपल्या. श्रीचरणीने लॅम्बला त्रिफळाचीत केले. अॅमी जोन्स आणि नाईट यांनी प्रत्येकी 30 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये जेमिमा रॉड्रिग्जने एकाकी लढत 66 धावा जमविल्या. चार्ली डीनने तिला बाद केले. उमा छेत्री आणि रिचा घोष यांनी अनुक्रमे 45 आणि 21 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे स्मिथने 2 तर इक्लेस्टोनने भारताचे तळाचे फलंदाज स्नेह राणा आणि क्रांती गौड यांना बाद केले. इंग्लंडने भारतावर 152 धावांनी विजय मिळविला.
दुसऱ्या एका सरावाच्या सामन्यात भारत अ संघाने न्यूझीलंडचा डकवर्थ लेव्हीस नियमाच्या आधारे चार गड्यांनी पराभव केला. पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यावेळेस भारत अ संघाने 6 बाद 226 धावा जमविल्या होत्या. तत्पूर्वी न्यूझीलंडच्या डावामध्ये सुझी बेट्स, जॉर्जीया प्लिमेर आणि अॅमेलिया केर हे तीन फलंदाज केवळ 17 धावांत बाद झाले. भारतीय संघातील गोलंदाज सायली सातघरेने 45 धावांत 3 गडी बाद केले. तत्पूर्वी न्यूझीलंड संघातील सोफी डिव्हाईन, हॅलिडे आणि मॅडी ग्रीन लवकर बाद झाल्या. यष्टीरक्षक गेझने 100 चेंडूत नाबाद 101 धावा झळकविल्या. जेस केरने 36 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडने 50 षटकात 273 धावा जमविल्या.
भारत अ संघाच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. सोफी डिव्हाईनने सलामीच्या वृंदा दिनेशला खाते उघडण्यापूर्वी बाद केले. त्यानंतर शेफाली वर्मा, गुज्जर आणि तेजल हसबनीस समवेत उपयुक्त भागिदाऱ्या केल्या. शेफाली वर्माने 70 धावांचे योगदान दिले. मिनू मणी आणि ममता माडीवाला यांनी अनुक्रमे नाबाद 39 आणि नाबाद 56 धावा जमविल्या. यावेळी पावसाला प्रारंभ झाल्याने खेळ थांबविण्यात आला आणि डकवर्थ-लेव्हिसच्या आधारे भारत अ संघाला चार गड्यांनी विजयी म्हणून घोषित केले.
द. आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 9 षटकात 3 बाद 45 धावा जमविल्या होत्या. यानंतर पावसाला प्रारंभ झाल्याने खेळ थांबविण्यात आला. बराच उशीर वाट पाहून पंचांनी हा सामना रद्द झाल्याचे घोषित केले. मारी झेनी कॅपने 21 धावा जमविल्या. बांगलादेशच्या नाहीदा अख्तरने तिला बाद केले. ब्रिट्सने 21 चेंडूत नाबाद 19 धावा जमविल्या. बांगलादेशच्या अख्तरने द.आफ्रिकेची कर्णधार वूलव्हर्टला खाते उघडण्यापूर्वी तसेच त्यानंतर तिने द. आफ्रिकेच्या डर्कसनला बाद केले. लंका आणि पाक यांच्यातील सामनाही पावसामुळे वाया गेला.









