पाचवी कसोटी : चौथ्या दिवशी इंग्लंडच्या 6 बाद 339 धावा : भारताला विजयासाठी 4 बळींची, इंग्लंडला 35 धावांची गरज
वृत्तसंस्था/ लीड्स
केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर हॅरी ब्रूक आणि जो रुट यांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर यजमान इंग्लंडचा संघ मालिकाविजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. चौथ्या दिवशी खराब सूर्यप्रकाश आणि पावसामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला, त्यावेळी इंग्लिश संघाने 6 बाद 339 धावा जमविल्या असून कसोटी रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. विजयासाठी इंग्लंडला 35 धावांची तर भारताला 4 बळी मिळविण्याची गरज आहे. दिवसअखेरीस जेमी स्मिथ 2 धावांवर खेळत होता. विशेष म्हणजे, आता पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाज काही चमत्कार करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
प्रारंभी, तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा दुसरा डाव 396 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचे टार्गेट मिळाले. या धावांचा पाठलाग करताना बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांनी अर्धशतकी भागीदारी केली. तिस्रया दिवसाच्या शेवटी जॅक क्रॉली 14 धावा करत माघारी परतला. डकेट 34 धावांवर नाबाद होता. यावेळी यजमान संघाचे 1 बाद 50 धावा केल्या होत्या. याच धावसंख्येवरुन चौथ्या दिवशी इंग्लंडने पुढे खेळायला सुरुवात केली. डकेटने अर्धशतकी खेळी साकारताना 6 चौकारासह 54 धावांचे योगदान दिले. अर्धशतकानंतर मात्र त्याला प्रसिध कृष्णाला बाद करत माघारी धाडले तर ऑली पोपने 27 धावांची खेळी केली. त्याला मोहम्मद सिराजने पायचीत केले. इंग्लंडला सुरूवातीला 3 धक्के बसले.
रुट-ब्रूकची शानदार शतके
पोप बाद झाल्यानंतर अनुभवी जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी 195 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. या जोडीने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यादरम्यान, ब्रूकने कसोटी कारकिर्दीतील 10 वे तर या मालिकेतील दुसरे शतक साजरे केले. जलद दहा कसोटी शतके नोंदवणारा तो गेल्या 70 वर्षातील पहिला फलंदाज बनला आहे. त्याने 98 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारासह 111 धावांची खेळी साकारली. शतकानंतर मात्र आक्रमक खेळताना त्याला आकाश दीपने बाद केले. चहापानाआधी ब्रूक बाद झाला. त्यानंतर रुटने बेथेलला सोबतीला घेत आणखी संघाचा धावफलक हलता ठेवला. चहापानानंतर रुटने कसोटी कारकिर्दीतील 39 वे शतक साजरे केले. त्याने 152 चेंडूचा सामना करताना 14 चौकारासह 105 धावांची खेळी साकारली. शतकानंतर मात्र तो लगेचच बाद झाला. विशेष म्हणजे, रुटने लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 104 धावा केल्या होत्या. त्यानंतर मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या सामन्यातही शतक झळकावलं होते. आता, पाचव्या सामन्यातही त्याने शतकी खेळी साकारली आहे. यासह अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेत शतकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याला प्रसिधने बाद केले तर बेथेलही (5) फार काळ टिकला नाही.
पावसामुळे खेळ लवकर थांबला
दरम्यान, खराब सूर्यप्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला, त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. मैदान यामुळे खूप ओले झाले आणि वेळ पाहता सामना पुन्हा सुरू होण्यासाठी वेळ लागला असता. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपवण्यात आला. आता पाचव्या दिवशी या सामन्याचा निकाल लागेल. इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची गरज आहे. तर भारताला विजयासाठी 4 विकेट्सची आवश्यकता आहे. दिवसअखेरीस इंग्लिश संघाने 76.2 षटकांत 6 गडी गमावत 339 धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
भारत 224 आणि 396
दक्षिण आफ्रिका 247 आणि दुसरा डाव 76.2 षटकांत 6 बाद 339 (जॅक क्रॉली 14, बेन डकेट 54, ऑली पोप 27, जो रुट 105, हॅरी ब्रूक 111, बेथेल 5, जेमी स्मिथ खेळत आहे 2, प्रसिध कृष्णा 3 बळी, मोहम्मद सिराज 2 बळी, आकाश दीप 1 बळी).
जो रुटचा आणखी एक माईलस्टोन
सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या जो रुटने टीम इंडियाविरुद्ध शेवटच्या कसोटीत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रुट 39 शतकासह चौथ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर 51 शतकासह सर्वात आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, शतकानंतर रुटने हेल्मेट काढून आपल्याकडील व्हाइट हेडबँड काढला अन् डोक्याला बांधला. त्याची ही कृती लक्षवेधी ठरली. रुटने ही शतकी खेळी 100 हून अधिक कसोटी सामने खेळणारे इंग्लंडचे दिग्गज आणि दिवंगत क्रिकेटपटू ग्राहम थॉर्प यांना समर्पित केली. याशिवाय, शतकी खेळीसह रुटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत 6 हजार धावांचा टप्पा पार केला. sंऊण् स्पर्धेत हा पल्ला गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. या यादीत फॅब फोरमधील ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथ 4278 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
सिराजची एक चूक पडली महागात
इंग्लंडच्या डावातील 35 व्या षटकांत प्रसिध कृष्णाने पहिल्या चेंडूवर ब्रूकला फसवले होते. त्याने मोठा शॉट खेळला. यावेळी सिराजने सीमारेषेवर त्याचा झेलही घेतला पण चेंडू पकडला तेव्हा त्याचा पाय सीमारेषेजवळ होता. झेल घेतल्यानंतर त्याचा पाय सीमारेषेच्या लाईनवर पडला आणि तोल जाऊन तो बाहेर गेला. त्यामुळे ब्रूकला षटकार मिळाला. त्याने केलेली चूक काही वेळात लक्षात आली पण तोवर वेळ निघून गेली होती. यावेळी ब्रूकला मिळालेले जीवदान भारतीय संघाला चांगलेच महागात पडल्याचे दिसून आले.
महत्वाचा बॉक्स
एकाच मालिकेत शुभमनची चार शतके
इंग्लंडविरुद्ध मालिकेत कर्णधार शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनी शतक ठोकली. या मालिकेत सर्वाधिक 4 शतके ही गिलने ठोकली. तर ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या तिघांनी प्रत्येकी 2-2 शतके पूर्ण केली. तर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या ऑलराउंडर जोडीने शतक करुन चौथा सामना हा बरोबरीत राखण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.









