वृत्तसंस्था / झुरीच
2025 च्या महिलांच्या युरो चषक फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत इंग्लंड महिला संघाने पिछाडीवरुन मुसंडी मारत स्वीडनचा पेनल्टीमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. त्यानंतर पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करत सामना निकालात काढला. सामना संपण्याला केवळ 12 मिनिटे बाकी असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करत हा सामना बरोबरीत नेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडने स्वीडनचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. 18 वर्षीय स्मिला होमबर्गला शेवटच्या फटक्यावर गोल नोंदविता आला नाही. आता या स्पर्धेत इंग्लंडचा उपांत्यफेरीचा सामना इटलीबरोबर जिनिव्हा येथे येत्या मंगळवारी होणार आहे.
स्पर्धेच्या गुणतक्त्यात स्वीडनने आपल्या गटातून तीन सामने जिंकून सर्वाधिक गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले. स्वीडनने या स्पर्धेत यापूर्वीच्या सामन्यात जर्मनीचा 4-1 असा पराभव केला होता. इंग्लंड आणि स्वीडन यांच्यातील सामन्यात स्वीडनने निर्धारीत वेळेत दोन गोलांची आघाडी इंग्लंडवर घेतली होती. त्यानंतर इंग्लंडने खेळाच्या उत्तराधार्थ दोन गुण नोंदवून बरोबरी केली. इंग्लंडचा महिला फुटबॉल संघ हा या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे.









