2-0 अशी आघाडी : बेअरस्टो-ब्रुकची वादळी खेळी : युवा गोलंदाज ऍटकिन्सनचे 20 धावांत 4 बळी
वृत्तसंस्था/ मँचेस्टर, इंग्लंड
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (1 ऑक्टोबर) खेळला गेला. या सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. जॉनी बेअरस्टो व हॅरी ब्रुक यांनी ठोकलेल्या तुफानी अर्धशतकानंतर युवा गोलंदाज ऍटकिन्सनने घेतलेल्या चार बळींमुळे इंग्लंडने 95 धावांनी शानदार विजय साजरा केला. यासोबतच चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 60 चेंडूत 86 धावांची खेळी साकारणाऱ्या जॉनी बेअरस्टोला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आज, उभय संघातील तिसरा सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे.
प्रारंभी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विल जॅक्स व बेअरस्टो यांनी चाळीस धावांची सलामी दिली. मात्र जॅक्स व मलान पाठोपाठ बाद झाले. जॅक्सने 11 चेंडूत 19 धावा केल्या. तर मलानला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर मैदानावर आलेल्या ब्रुकने बेअरस्टोला साथीला घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ब्रुकने 36 चेंडूंवर पाच षटकार व पाच चौकारांच्या मदतीने 67 धावा कुटल्या. तर, अखेरपर्यंत नाबाद राहिलेल्या बेअरस्टोने 8 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 86 धावांची खेळी केली. यामुळे इंग्लंडला 20 षटकांत 4 बाद 198 धावांपर्यंत मजल मारता आली. मोईन अलीने 6 धावा केल्या तर कर्णधार बटलर 13 धावांवर नाबाद राहिला.
किवीज फलंदाजांची सपशेल निराशा
धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाला पहिल्यापासून सूर गवसला नाही. सलामीवीर फिन अॅलन 3 व डेव्हॉन कॉनवे 2 स्वस्तात बाद झाले. यानंतर टीम सेफर्ट 39 व ग्लेन फिलिप्स 22 धावा केल्या. पण इतर कोणताही फलंदाज 15 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने न्यूझीलंडचा डाव 13.5 षटकांत 103 धावांवर आटोपला.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज ऍटकिन्सनने आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली. त्याच्या अचूक गोलंदाजीला किवी संघाच्या फलंदाजांकडे उत्तर नव्हते. ऍटकिन्सनने पूर्ण 3 षटकेही टाकली नाहीत. त्याने 7 च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटसह गोलंदाजी केली आणि केवळ 2.5 षटकात 4 बळी घेतले. आदिल रशीदने दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय, सॅम करन, लिव्हिंगस्टोन, विल जॅक्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक इंग्लंड 20 षटकांत 4 बाद 198 (जॉनी बेअरस्टो नाबाद 86, विल जॅक्स 19, मलान 0, हॅरी ब्रुक 67, मोईन अली 6, बटलर नाबाद 13, ईश सोधी 2 तर साऊथी, सँटेनर एक बळी)
न्यूझीलंड 13.5 षटकांत सर्वबाद 103 (टीम सेफर्ट 39, ग्लेन फिलिप्स 22, चॅपमन 15, ऍटकिन्सन 20 धावांत 4 बळी, आदिल रशीद 2 बळी).









