कर्णधार सोफी डिव्हाईनला निरोप : अॅमी जोन्स सामनावीर
वृत्तसंस्था/विशाखापट्टणम
आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या प्राथमिक गटातील 27 व्या सामन्यात फिरकी गोलंदाजांच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडचा आठ गड्यांनी दणदणीत पराभव केला. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनचा हा शेवटचा सामना आहे. या सामन्यानंतर ती क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. नाबाद 86 धावा झळकाविणाऱ्या इंग्लंडच्या अॅमी जोन्सला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजनी न्यूझीलंडला 38.2 षटकात 168 धावांत गुंडाळले. त्यानंतर इंग्लंडने 29.2 षटकात 2 बाद 172 धावा जमवित प्राथमिक फेरीतील आपला हा शेवटचा विजय नोंदविला. न्यूझीलंडचे या स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच समाप्त झाले होते. भारताकडून ते पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडचा हा औपचारिक सामना होता. या विजयामुळे इंग्लंडने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात 11 गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. तर विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया 13 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या आणि भारत चौथ्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या प्लिमेरने 57 चेंडूत 7 चौकारांसह 43, अॅमेलिया केरने 43 चेंडूत 5 चौकारांसह 35, कर्णधार सोफी डिव्हाईनने 35 चेंडूत 1 चौकारासह 23, मॅडी ग्रीनने 2 चौकारांसह 18, गेझने 1 षटकार आणि 1 चौकारासह 14, बेट्स आणि जेस केर यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. प्लिमेर आणि अॅमेलिया केर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 68 धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. न्यूझीलंडने पहिल्या 10 षटकात 57 धावांत 1 गडी गमाविला होता. इंग्लंडतर्फे लिन्से स्मिथने 30 धावांत 3, नॅट सिव्हेर ब्रंट आणि अॅलिसी कॅप्से यांनी प्रत्येकी 2 तर चार्ली डीन आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अॅमी जोन्स आणि बिमाँट या सलामीच्या जोडीने इंग्लंडच्या डावाला दमदार सुरुवात करुन देताना 14.4 षटकात 75 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडच्या तेहुहूने बिमाँटला पायचीत केले. तिने 38 चेंडूत 7 चौकारांसह 40 धावा जमविल्या. बिमाँट बाद झाल्यानंतर जोन्सला नाईटने चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 43 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडच्या डिव्हाईनने नाईटला पायचीत केले. तिने 40 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 33 धावा जमविल्या. नाईट बाद झाली त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी 11 धावांची गरज होती. अॅमी जोन्स व हॉज यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. अॅमी जोन्सने 92 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 86 तर हॉजने नाबाद 2 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे तेहुहू आणि डिव्हाईन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडने हा सामना 124 चेंडू बाकी ठेऊन जिंकला.
डिव्हाईनला निरोप
न्यूझीलंडची कर्णधार डिव्हाईनचा वनडे क्रिकेटमधील शेवटचा बळी इंग्लंडची नाईट ठरली. सोफी डिव्हाईनने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 159 वनडे सामन्यात 32.66 धावांच्या सरासरीने 9 शतकांसह 4,279 धावा जमविल्या आहेत. डिव्हाईनने वनडे क्रिकेटमधील आपल्या शेवटच्या सामन्यात 1 चौकारासह 23 धावा जमविल्या. या सामन्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी तसेच इंग्लंडच्या खेळाडूंनी डिव्हाईनशी हस्तांदोलन करुन तिला निरोप दिला. उपस्थित क्रिकेट शौकिनांनीही उभे राहून तिला शूभेच्छा दिल्या. न्यूझीलंड संघाला या स्पर्धेत मात्र उपांत्य फेरी गाठता आली नाही. या स्पर्धेमध्ये डिव्हाईनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शतक तर त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये सलग अर्धशतके झळकाविली होती.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड 38.2 षटकात सर्वबाद 168 (प्लिमेर 43, अॅमेलिया केर 35, डिव्हाईन 23, ग्रीन 18, गेझ 14, बेट्स व जेस केर प्रत्येकी 10 धावा, स्मिथ 3-30, नॅट सिव्हेर ब्रंट व कॅप्से प्रत्येकी 2 बळी, डीन व इक्लेस्टोन प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 29.2 षटकात 2 बाद 172 (अॅमी जोन्स नाबाद 86, बिमाँट 40, नाईट 33, हॉज नाबाद 2, अवांतर 11, डिव्हाईन व तेहुहू प्रत्येकी 1 बळी).









