वृत्तसंस्था / ख्राईस्टचर्च
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात सामनावीर आणि कर्णधार हॅरी ब्रुक तसेच फिल सॉल्टच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने यजमान न्यूझीलंडचा 65 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे इंग्लंडने या मालिकेत न्यूझीलंडवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 20 षटकात 4 बाद 236 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव 18 षटकात 171 धावांत आटोपला. ब्रुक, सॉल्ट आणि आदिल रशीद हे इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या फिल सॉल्टने 56 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 85 धावा झोडपल्या. बटलर केवळ 4 धावांवर बाद झाला. बेथेलने 12 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह जलद 24 धावा केल्या. सॉल्ट आणि कर्णधार ब्रुक या जोडीने दमदार फलंदाजी करताना तिसऱ्या गड्यासाठी 11.2 षटकात 129 धावांची शतकी भागिदारी केली. ब्रुकने 35 चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकारांसह 78 धावा झळकविल्या. बँटनने 12 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 29 तर सॅम करणने 1 षटकारासह नाबाद 8 धावा केल्या. इंग्लंडच्या डावामध्ये 10 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 68 धावा जमविताना 2 गडी गमविले. सॉल्टने 33 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह तर ब्रुकने 22 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले. 10 षटकाअखेर इंग्लंडची स्थिती 2 बाद 110 अशी होती. इंग्लंडच्या डावाला सुरूवात झाल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर सॉल्टने हेन्रीच्या गोलंदाजीवर मिडविकेटच्या दिशेने षटकार खेचला. सॉल्टने डावातील 10 षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार ब्रुकने टी-20 प्रकारात 1000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. पूर्ण कोरड्या असलेल्या खेळपट्टीवर ब्रुक आणि सॉल्ट या इंग्लंडच्या फलंदाजांनी न्यूझीलंडची गोलंदाजी चांगलीच झोडपली. न्यूझीलंडतर्फे जेमिसनने 47 धावांत 2 तर डफी आणि ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या सिफर्टने 29 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 39, चॅपमनने 24 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 28, निश्चामने 13 चेंडूत 2 चौकारांसह 17, कर्णधार सँटेनरने 15 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 36 धावा जमविल्या. न्यूझीलंडला 16 अवांतर धावा मिळाल्या. इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा निम्मा संघ 94 धावांत बाद झाला होता. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 60 धावा जमविताना 2 गडी गमविले. न्यूझीलंडचे अर्धशतक 34 चेंडूत, शतक 75 चेंडूत तर दीड शतक 95 चेंडूत नोंदविले गेले. सिफर्ट आणि चॅपमन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 69 धावांची भागिदारी केली. इंग्लंडतर्फे फिरकी गोलंदाज आदिल रशीद प्रभावी ठरला. त्याने 32 धावांत 4 गडी बाद केले. वूड, कार्से आणि डॉसन यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. या मालिकेतील गेल्या शनिवारी झालेला पहिला सामना इंग्लंडचा डाव अर्धवट असताना पावसाला प्रारंभ झाला आणि त्यानंतर संततधार सुरू झाल्याने हा सामना पंचांनी रद्द म्हणून जाहीर केला होता.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड 20 षटकात 4 बाद 236 (सॉल्ट 85, बेथेल 24, ब्रुक 78, बॅन्टन नाबाद 29, अवांतर 8, जेमिसन 2-47, डफी व ब्dरोसवेल प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड 18 षटकात सर्वबाद 171 (सिफर्ट 39, सँटेनर 36, चॅपमन 28, निश्चाम 17, अवांतर 16, आदिल रशीद 4-32, डॉसन, वूड, कार्से प्रत्येकी 2 बळी)









