भुवनेश्वर/ वृत्तसंस्था
2025 च्या येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या प्रोलिग हॉकी स्पर्धेतील झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या महिला हॉकी संघाने यजमान भारताचा शूटआऊटमध्ये 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते.
या सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर निर्धारीत वेळेत इंग्लंडतर्फे पेजी गिलॉटने 40 व्या मिनिटाला तर टेसा हॉवर्डने 56 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले गेले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. भारतातर्फे नवनीत कौरने 53 व्या मिनिटाला तर ऋतुजा पिसाळने 57 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले गेले. निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी शूटआऊटचा अवलंब केला. निर्धारीत वेळेत भारताच्या कौरने पेनल्टी स्ट्रोकवर तर ऋतुजाने मैदानी गोल केला होता. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतातर्फे केवळ नवनीत कौरने गोल केला. तर कर्णधार सलिमा टेटे, सुनेलिता टोप्पो आणि लालरिमसियाम यांचे फटके इंग्लंडच्या गोलरक्षकांनी थोपविल्याने भारताचे या सामन्यातील आव्हान संपुष्टात आले. इंग्लंडतर्फे लिली वॉकर आणि कर्णधार सोफी हॅमिल्टन यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल केले. या सामन्यातील विजयामुळे इंग्लंडला बोनस गुण मिळाला. भारतीय महिला हॉकी संघाने या स्पर्धेत गेल्या शनिवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतीत इंग्लंडचा 3-2 असा पराभव केला होता. भारतीय महिला हॉकी संघाचा आता पुढील सामना मंगळवारी येथे स्पेनबरोबर होणार आहे.









