स्मृती मानधनाचे अर्धशतक तसेच रेणुकासिंग ठाकुरची कामगिरी वाया
वृत्तसंस्था/ गायबेरा (दक्षिण आफ्रिका)
आयसीसीच्या टी-20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 11 धावांनी निसटता पराभव करून गट 2 मध्ये गुणतक्त्यात सहा गुणासह आघाडीचे स्थान पटकाविले. इंग्लंडच्या अर्धशतक झळकवणाऱ्या नॅट स्किव्हेर ब्रंटला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेतील भारताचा हा पहिला पराभव आहे. भारत या गटात तीन सामन्यातून 4 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. आता भारताचा या गटातील शेवटचा सामना आयर्लंडबरोबर 20 फेब्रुवारीला खेळवला जाईल.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. पहिल्या षटकापासून इंग्लंडच्या डावाला गळती सुरू झाली. भारताच्या रेणुकासिंगने आपल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर इंग्लंडच्या डॅनी वेटला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. त्यानंतर रेणुकासिंगने आपल्या तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अॅलिसी कॅप्सेचा तीन धावावर त्रिफळा उडवला. रेणुकासिंगने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना सलामीच्या सोफिया डंक्लेला त्रिफळाचित केले. तिने 1 चौकारासह 10 धावा जमवल्या. इंग्लंडची स्थिती यावेळी 3 बाद 29 अशी होती.

नॅट स्किव्हेर ब्रंट आणि कर्णधार हिथेर नाईट यांनी चौथ्या गड्यासाठी 51 धावांची भागीदारी केल्याने इंग्लंडला डाव सावरला. शिखा पांडेने इंग्लंडची ही जोडी फोडताना नाईटला झेलबाद केले. तिने 23 चेंडूत 4 चौकारासह 28 धावा जमवल्या. नाईट बाद झाल्यानंतर नॅट स्किव्हेरला अॅमी जोन्सने बऱ्यापैकी साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 40 धावांची भर घातली. दीप्ती शर्माने नॅट स्किव्हेर ब्रंटला मंदानाकरवी झेलबाद केले. तिने 42 चेंडूत 5 चौकारासह 50 धावा जमवल्या. रेणुकासिंगने अॅमी जोन्सला झेलबाद केले. जोन्सने 27 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 40 धावा झळकवल्या. अॅमी जोन्स डावातील शेवटच्या षटकात बाद झाली. रेणुकासिंगने या शेवटच्या षटकात दोन बळी मिळवले. तिने या षटकातील पाचव्या चेंडूवर कॅथरेनी स्किव्हेर ब्रंटला खाते उघडण्यापूर्वी यादवकरवी झेलबाद केले. इक्लेस्टोन 1 षटकारासह 11 धावावर नाबाद राहिली. इंग्लंडच्या डावात 3 षटकात आणि 13 चौकार नोंदवले गेले. भारतातर्फे रेणुकासिंग ठाकुर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने आपल्या चार षटकात 15 धावांच्या मोबदल्यात 5 गडी बाद केले. शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने 20 षटकात 5 बाद 140 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 11 धावांनी गमवावा लागला. भारताच्या डावामध्ये सलामीच्या स्मृती मानधनाने 41 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह 52, शेफाली वर्माने 1 चौकारासह 8, रॉड्रीग्जने 16 चेंडूत 13, कर्णधार कौरने 4, दीप्ती शर्माने 7 धावा जमवल्या. रिचा घोषने शेवटपर्यंत एकाकी लढत देत 34 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 47 तर वस्त्रकरने नाबाद 2 धावा जमवल्या. भारताच्या डावात 3 षटकार आणि 12 चौकार नोंदवले गेले. अचूक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर इंग्लंडने हा सामना जिंकला. इंग्लंडतर्फे सारा ग्लेनने 2 तर लॉरेन बेल आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यात स्मृती मानधनाचे अर्धशतक तसेच रेणुकासिंग ठाकुरच्या 5 बळींची कामगिरी वाया गेली.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकात 7 बाद 151 (डंक्ले 10, कॅप्से 3, नॅट स्किव्हेर ब्रंट 50, नाईट 28, अॅमी जोन्स 40, इक्लेस्टोन नाबाद 11, रेणुकासिंग ठाकुर 5-15, शिखा पांडे 1-20, दीप्ती शर्मा 1-37). भारत 20 षटकात 5 बाद 140 (स्मृती मानधना 52, शेफाली वर्मा 8, रॉड्रीग्ज 13, कौर 4, रिचा घोष नाबाद 47, दीप्ती शर्मा 7, वस्त्रकर नाबाद 2, ग्लेन 2-27, इक्लेस्टोन 1-14, बेल 1-22).
आजचे सामने
पाक वि. वेस्ट इंडीज (पर्ल)
न्यूझीलंड वि. लंका (पर्ल)









