अॅशेस मालिकेतील इंग्लंडचे आव्हान जीवंत : ऑस्ट्रेलियाची 2-1 अशी आघाडी
वृत्तसंस्था/ लिडस्
यजमान इंग्लंडने पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. येथे रविवारी झालेल्या तिसऱ्या कसोटीतील खेळाच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3 गड्यांनी पराभव केला. या मालिकेत इंग्लंडचा हा पहिला विजय असून ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या मार्क वूडला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा जमविल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 237 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 26 धावांची आघाडी मिळविली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात मार्शचे शतक महत्त्वाचे ठरले. तर इंग्लंडतर्फे मार्क वूडने 5 गडी बाद केले. 26 धावांची आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 224 धावा जमवित इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 251 धावांचे आव्हान दिले.
या कसोटीतील शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंतचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. ऑस्ट्रेलियाने 4 बाद 116 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे शेवटचे 6 गडी 108 धावांची भर घालत तंबूत परतले. हेडने 3 षटकार आणि 7 चौकारांसह 77, ख्वॉजाने 3 चौकारांसह 43, लाबूशेनने 5 चौकारांसह 33, मार्शने 5 चौकारांसह 28,स्टार्कने 2 चौकारांसह 16 आणि मर्फीने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे ब्रॉड आणि वोक्स यांनी प्रत्येकी 3 तर मार्क वूड आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. या सामन्यामध्ये इंग्लंडच्या मार्क वूडने 7 गडी बाद केले. शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 27 धावा जमविल्या होत्या.
रविवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला इंग्लंडने प्रारंभ केला आणि उपाहारापर्यंत त्यांनी 32 षटकात 4 बाद 153 धावा जमविल्या होत्या. क्रॉले आणि डकेट या सलामीच्या जोडीने 42 धावांची भागिदारी केली. स्टार्कने डकेटला पायचीत केले. त्याने 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. स्टार्कने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना मोईन अलीचा 5 धावावर त्रिफळा उडविला. मार्शने क्रॉलेला यष्टीरक्षक कॅरेकरवी झेलबाद केले. त्याने 55 चेंडूत 5 चौकारांसह 44 धावा जमविल्या. रूट आणि ब्रूक या जोडीने चौथ्या गड्यासाठी 38 धावांची भर घातली. कमिन्सने रुटला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. उपाहारावेळी ब्रूक 40 तर स्टोक्स 7 धावांवर खेळत होते. इंग्लंडला यावेळी विजयासाठी आणखी 101 धावांची गरज होती. आणि त्यांचे 6 गडी खेळावयाचे होते.

खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर स्टार्कने स्टोक्सला कॅरेकरवी झेलबाद करुन आपल्या संघासमोरील मोठा अडथळा दूर केला. स्टोक्सने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. यष्टीरक्षक आणि फलंदाज बेअरस्टो पुन्हा अधिक धावा जमविण्यास अपयशी ठरला. स्टार्कच्या गोलंदाजीवर तो 5 धावावर त्रिफळाचीत झाला. इंग्लंडची स्थिती यावेळी 6 बाद 171 अशी होती. ब्रूक आणि वोक्स या जोडीने सातव्या गड्यासाठी 59 धावांची भागिदारी केली. ब्रूकने 93 चेंडूत 9 चौकारांसह 75 धावा झळकाविल्या. स्टार्कने ब्रूकला कमिन्सकरवी झेलबाद केले. इंग्लंडल यावेळी विजयासाठी 21 धावांची गरज होती. वोक्स आणि वूड या जोडीने विजयाचे सोपस्कार अखेर पूर्ण करत या मालिकेत आपल्या संघाचे विजयाचे खाते उघडले. वोक्सने 47 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 32 तर वूडने 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 16 धावा जमविल्या. 50 षटकात इंग्लंडने 7 बाद 254 धावा जमवित आपला विजय नोंदविला. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्कने 78 धावात 5 तर कमिन्स आणि मार्श यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया प. डाव 60.4 षटकात सर्व बाद 263, इंग्लंड प. डाव 52.3 षटकात सर्व बाद 237, ऑस्ट्रेलिया दु. डाव 67.1 षटकात सर्वबाद 224 (ख्वाजा 43, वॉर्नर 1, लाबुशेन 33, स्मिथ 2, हेड 77, मिचेल मार्श 28, कॅरे 5, स्टार्क 16, मर्फी 11, अवांतर 7, ब्रॉड 3-45, वोक्स 3-68, मार्क वूड 66-2, मोईन अली 2-34), इंग्लंड दु. डाव 50 षटकात 7 बाद 254 (झॅक क्रॉले 44, डकेट 23, मोईन अली 5, रुट 21, हॅरी ब्रुक 75, स्टोक्स 13, बेअरस्टो 5, ख्रिस वोक्स नाबाद 32, मार्क वूड नाबाद 16, अवांतर 20, स्टार्क 5-78, कमिन्स 1-77, मार्श 1-23).









