पाच सामन्यांची अॅशेस मालिका 2-2 बरोबरीत
वृत्तसंस्था/ ओव्हल
पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 49 धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. दरम्यान, सामन्यात 7 बळी घेणाऱ्या ख्रिस वोक्सला सामनावीर तर मिचेल स्टार्क व ख्रिस वोक्सला मालिकावीर पुरस्कार विभागून देण्यात आला. अॅशेस चषक मात्र ऑस्ट्रेलियाकडेच राहिला आहे.
या शेवटच्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 283 धावा जमविल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 295 धावा जमवित 12 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात 395 धावा जमवित ऑस्ट्रेलियाला निर्णायक विजयासाठी 384 धावांचे आव्हान दिले होते.
दरम्यान ऑस्ट्रेलियाने हे आव्हान स्वीकारताना रविवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर बिनबाद 135 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून त्यांनी सोमवारी शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. इंग्लंडच्या वोक्सने वॉर्नरला झेलबाद केले. त्याने 106 चेंडूत 9 चौकारांसह 60 धावा जमविताना ख्वाजा समवेत सलामीच्या गड्यासाठी 140 धावांची भागिदारी केली. वॉर्नर बाद झाल्यानंतर वोक्सने
ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का देताना ख्वाजाला पायचित केले. त्याने 145 चेंडूत 8 चौकारांसह 72 धावा जमविल्या. मार्क वूडने लाबुशेनला 13 धावावर झेलबाद केले. यानंतर, स्टीव्ह स्मिथ आणि हेड या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. स्मिथने अर्धशतकी खेळी साकारताना 54 धावा केल्या. तर हेडने 43 धावांचे योगदान दिले. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाने 3 बाद 238 धावा जमविल्या होत्या. नंतर त्यांचा डाव 94.4 षटकांत 334 धावांत आटोपला. वोक्सने 4, मोईनने 3, ब्रॉडने 2 बळी टिपले.
पावसाला प्रारंभ झाल्याने उपाहारानंतर चहापानापर्यंतचा खेळ वाया गेला आहे. स्मिथ-हेड जोडी फुटल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाला गळती लागली. तळाचे फलंदाज झटपट बाद झाल्यानेऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 94.4 षटकांत 334 धावांवर आटोपला.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड प. डाव 54.4 षटकात सर्वबाद 283, ऑस्ट्रेलिया प. डाव – 103.1 षटकात सर्वबाद 295, इंग्लंड दु. डाव – 81.5 षटकात सर्वबाद 395, ऑस्ट्रेलिया दु. डाव – 94.4 षटकांत सर्वबाद 334 (वॉर्नर 60, ख्वाजा 72, लाबुशेन 13, स्मिथ 54, हेड 43, मार्श 6, कॅरे 28, स्टार्क 0, अवांत्तर 26 वोक्स 4-50, मोईन अली 3-76, वूड 1-34,
ब्रॉड 2-64).









