ऑस्ट्रेलियन संघाला इतिहास घडविण्याची संधी : कमिन्स, इंग्लंड मागील पराभवाचे उट्टे काढण्याच्या तयारीत

वृत्तसंस्था /बर्मिंगहॅम
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील बहुचर्चित ऍशेस मालिका आज शुक्रवारपासून सुरू होत असून यजमान इंग्लंड संघ या मालिकेतून 2021-22 साली त्यांना स्वीकाराव्या लागलेल्या 4-0 पराभवाचे उट्टे काढण्यास उत्सुक असेल, तर ऑस्ट्रेलिया मागील 20 वर्षांतील इंग्लिश भूमीवरील पहिली ऍशेस मालिका जिंकण्याच्या ध्येयाने उतरेल. या पार्श्वभूमीवर इंग्लिश भूमीवरील मागची ऍशेस मालिका ऑस्ट्रेलियाने 2001 साली कशी जिंकली होती त्याच्या आठवणींना उजाळा देण्याबरोबर यावेळी परिस्थिती त्यांच्या बाजूने आहे की विरुद्ध, यावर भाष्य करणे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पसंत केले आहे, तर नॅथन लियॉनने ही मालिका कोण गाजवणार त्याविषयी भाकीत केले आहे. सध्या इंग्लंडचा संघ कर्णधार बेन स्टोक्स आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेन्डन मेकॉलम यांनी राबविलेल्या आक्रमक ‘बाझबॉल’ धोरणाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यास उत्सुक झालेला आहे. हे धोरण राबविण्यास सुरुवात केल्यापासून त्यांनी 13 पैकी 11 कसोटी सामने जिंकलेले आहेत आणि विजय मिळविण्याचे ध्येय समोर ठेवून खेळल्या जाणाऱ्या आक्रमक व सकारात्मक क्रिकेटच्या जोरावर त्यांनी वेळोवेळी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजविलेले आहे.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये यापूर्वी 2001 मध्ये ऍशेस मालिका जिंकली होती. त्यावेळी मार्प वॉ (5 सामन्यांतून 430 धावा), डॅमिएन मार्टिन (382 धावा) व ऍडम गिलख्रिस्ट (340 धावा) आणि मॅकग्रा (32 बळी), शेन वॉर्न (31 बळी) तसेच जेसन गिलेस्पी (19 बळी) यांनी ऑस्ट्रेलियातर्फे सर्वोत्तम कामगिरी करून दौरा गाजविला होता. त्यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला त्यांच्या भूमीत 4-1 ने पराभूत केले होते. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाला फारसे यश मिळू शकलेले नसल्याने यावेळी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरल्यास ते त्यांच्यासाठी फार दिलासादायक ठरेल.ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने यावेळी त्याच्या संघाला इतिहास घडविण्याची संधी असल्याचे म्हटले आहे. आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात आणि आमची शैली प्रभावीपणे वापरण्यात यशस्वी झालो आहोत, असे कमिन्सने म्हटले आहे. दुसरीकडे, फिरकी गोलंदाज नॅथन लियॉनने ही मालिका जिंकल्यास हा विजय पुढील वर्षांत ऑस्ट्रेलियन क्रिकेटला बदलून टाकेल, असे म्हटले आहे. आजवरच्या सर्वांत महान ऑस्ट्रेलियन संघांपैकी एक बनणे हे आमचे ध्येय आहे, असेही लियॉनने म्हटले आहे. लियॉनने कॅमेरॉन ग्रीन या मालिकेत भरपूर चमकण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मागील काही वर्षांत आणि खास करून आयपीएलमध्ये खेळल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला आहे, असे त्याने म्हटले आहे.
दोन्ही संघ चांगल्या पद्धतीने खेळत असून ही मालिका रोमांचक ठरेल, असे ऑस्ट्रेलियाचा मुख्य फलंदाज स्टिव्ह स्मिथने म्हटले आहे. 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका खेळली होती. त्यावेळच्या संघापेक्षा आताचा आमचा संघ जास्त चांगला आहे. आम्ही आता जास्त स्थिरावलेलो असून प्रत्येकाला त्याची भूमिका माहीत आहे, असे मार्कस लाबुशेनने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने इंग्लंडचे गोलंदाज दर्जेदार असून मागील काही काळापासून त्यांची फलंदाजीही चमकत असल्याने तो संघ घातक दिसत असल्याचे म्हटले आहे. मात्र इंग्लंडने पाटा खेळपट्ट्या तयार केल्यास त्यांच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने म्हटले आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि फिरकीपटू जॅक लीच यांना दुखापतींनी गमावल्यामुळे इंग्लंडच्या माऱ्याला आधीच धक्का बसला असल्याचे पाँटिंगने म्हटले आहे.
दोन्ही संघ
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हॅझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, मोईन अली, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोश टॉंग, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 पासून.थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (सोनी स्पोर्ट्स 5), सोनी ऍप.









