वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सलामीच्या लढतीतील मानहानीकारक पराभवानंतर मोहीम पुन्हा रुळावर आलेल्या इंग्लंडचा सामना आज रविवारी येथे होणार असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात अफगाणिस्तानशी होणार असून यावेळी सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजविण्याबरोबर आपली निव्वळ धावसरासरी सुधारण्यावर त्यांचा भर असेल. गतविजेत्या इंग्लंडच्या मोहिमेची सुरुवात निराशाजनक होऊन अहमदाबाद येथे झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने त्यांना नऊ गडी राखून पराभूत केले होते. पण जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघाने शैलीत उसळी घेताना बांगलादेशचा मंगळवारी धर्मशाला येथे 137 धावांनी पराभव केला होता.

इंग्लंडने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत शानदार पुनरागमन केले होते. या सामन्यात इंग्लंडने आपली ताकद दाखवून सलामीवीर डेविड मलानने 107 चेंडूंत 140 धावा फटकावल्या होत्या, तर ज्यो रूटने सलग अर्धशतक झळकावताना आपला चांगला फॉर्म कायम ठेवला होता. जॉनी बेअरस्टोनेही 50 धावांचे योगदान दिले होते. तुलनेने लहान अऊण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीवर आज मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने सलामीवीरांकडून आणखी एक चांगली सुरुवातीची अपेक्षा इंग्लंडला असेल. याशिवाय कर्णधार बटलर, हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनाही मधल्या फळीत भरीव योगदान देऊन स्पर्धेत आपली छाप उमटवायची असेल.
मोईन अलीच्या जागी रीस टोपलीला घेण्याचा इंग्लंडचा निर्णय बांगलादेशविरुद्ध भरपूर फायदेशीर ठरला. कारण या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने त्याच्या 10 षटकांत 43 धावा देऊन 4 बळी घेतले. वोक्स, वूड, करन आणि आदिल रशिद हे गोलंदाजही फॉर्ममध्ये परतले आहेत. इंग्लंडला अफगाणिस्तानविरुद्ध केवळ विजय मिळवायचा नाही, तर मोठ्या फरकाने त्यांना नमवून आपली धावसरासरी वाढवायची आहे. दुसरीकडे, सलग पराभवांनंतर अफगाण संघाचा आत्मविश्वास कमी झाला आहे. अफगाणिस्तानचा बांगलादेशने सहा गडी राखून, तर यजमान भारताने आठ गडी राखून पराभव केला. आज ते पहिला धक्का देण्याच्या तयारीने मैदानात उतरू शकतात, पण हे काम सोपे नाही.
अफगाणिस्तानची चिंता त्यांच्या खेळाच्या सर्व विभागांविषयी आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांचे फलंदाज गडबडले. त्यामुळे 156 इतकी कमी धावसंख्या नोंदविली गेली. त्यानंतर भारताविऊद्ध 8 बाद 272 पर्यंत मजल मारूनही त्यांची गोलंदाजी गडबडली. अफगाणिस्तानची मुख्य चिंता त्यांच्या सलामीवीरांच्या कामगिरीविषयी आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान हे दोन्ही सलामीवीर चांगली सुऊवात करून देण्यात अपयशी ठरले आहेत. अफगाणिस्तानची गोलंदाजी देखील दोन्ही सामन्यांमध्ये सामान्य दिसली आहे आणि संघ आगामी सामन्यांमध्ये फझलहक फाऊखी, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि रशिद खान यासारख्या गोलंदाजांकडून अधिक सुधारित कामगिरीची अपेक्षा बाळगून असेल.









