मडगाव : मडगाव पालिकेच्या वाहनांच्या दुरुस्तीसाठी अभियंत्यांना स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करावे लागत असून त्यांना हे पैसेही वेळेत मिळत नसल्याचे समोर आले आहे. जेव्हा जेव्हा वाहनाच्या दुऊस्तीचे कोणतेही काम केले जाते तेव्हा तेव्हा त्या कामाची बिले संबंधित विभागात जमा केली जातात. मात्र, बिले वेळेत फेडली जात नाहीत. त्यामुळे बहुतेक वेळा मी माझ्या खिशातून पैसे खर्च करून प्राधान्यक्रमाने कामे पार पाडतो, असे ऑटोमोबाईल अभियंता रोहित गावकर यांनी मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
वाहन दुऊस्तीच्या कामांचा खर्च जास्त आहे. बहुतांश दुऊस्तीची कामे तातडीने करणे आवश्यक असते. खर्चासाठी कायमस्वरूपी आगाऊ निधी उपलब्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनांच्या दुऊस्तीच्या कामाला होणारी दिरंगाई टाळण्यासाठी आणि वाहनांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी माझ्या वैयक्तिक बचतीतून मी पैसे खर्च करत आलो आहे. त्यानंतर ते पैसे मिळविण्यासाठी बिले सादर करावी लागतात. तथापि, बहुतेक कामांवर खर्च केलेल्या पैशाची परतफेड होण्यास विलंब होतो, असे गावकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मडगाव पालिकेकडे एकूण 37 वाहने आहेत. यात कर्मचाऱ्यांची वाहने, कचरावाहू वाहने आणि रोड गँगची वाहने यांचा समावेश आहे. वाहनांची दैनंदिन दुऊस्ती आणि देखभाल हे एक मोठे काम आहे, जे वेळेत पूर्ण करणे आवश्यक असते. विशेष म्हणजे कचरावाहू वाहनांची झीज वारंवार होत असते. कोणत्याही वाहनाचे काम करण्यासाठी मंडळाकडून परवानगी घेणे आवश्यक असते. काम पार पाडण्यासाठीचे कागदोपत्री सोपस्कार करण्याकरिता माझ्या हाताखाली स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले जात नाहीत, त्यामुळे ही कामे पार पाडणे खूप कठीण होते, असे त्यांनी म्हटले आहे.









