वृत्तसंस्था/ फरीदाबाद
जेसी बोस वायएमसीए विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये मॅकेनिकल इंजिनियरिंगची विद्यार्थिनी वंशिकाने स्वत:च्या खोलीत गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत त्यावर उत्तरीय तपासणी करविली. यानंतर मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. मुलीने हे टोकाचे पाऊल एका युवकामुळे उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच हॉस्टेलमधील महिला कर्मचाऱ्याने वंशिकाचा छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महिला कर्मचाऱ्याने मुलीच्या खोलीत घुसून तिच्यासोबत गैरवर्तन केले होते असे त्यांनी सांगितले आहे. तर खोलीत मुलीचा लॅपटॉप आणि 50 हजार रुपये मिळालेले नाहीत असा दावा त्यांनी केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. वंशिकाने काही दिवसांपूर्वी स्वत:च्या पित्याला फोन करत नव्या वर्जनच्या लॅपटॉपची मागणी केली होती. पित्याने लॅपटॉप खरेदी करत तिला दिला होता.
वंशिका खोलीत दोन अन्य विद्यार्थिनींसोबत राहत होती. एक विद्यार्थिनी स्वत:च्या गावी गेली होती, तर दुसरी विद्यार्थिनी खोलीबाहेर गेल्यावर वंशिकाने आत्महत्येचे पाऊल उचलले होते. वंशिकाला सौरभ नावाचा युवक त्रास देत होता असे तिच्या वडिलांनी सांगितले आहे.









