भारत चीनच्याही मागे : व्यवस्थापन सल्लागार कंपनी व्हेक्टरच्या अहवालामधून माहिती
नवी दिल्ली :
भारतीय वाहन उत्पादक ‘अंतिम टप्प्यातील अभियांत्रिकी बदलांमुळे’ नवीन मॉडेल्स लाँच करण्यास विलंब करत आहेत. ही एक समस्या आहे, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम करू शकते. ही माहिती एका व्यवस्थापन सल्लागार कंपनीने केलेल्या अभ्यासात देण्यात आली.
व्हेक्टर कन्सल्टिंग ग्रुपच्या मते, सुमारे 80 टक्के मूळ उपकरण उत्पादकांनी (ओइएम) ‘अडथळे’ नोंदवले आहेत. व्हेक्टरचे व्यवस्थापकीय भागीदार रवींद्र पत्की म्हणाले, ‘भारतात आता उशीर झाला आहे आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत तर त्याहूनही अधिक. जर आपला वाहन विकास मंदावला तर भारत जगाच्या मागे पडेल अशी भीती आहे. चीन आपली वाहने 18 ते 24 महिन्यांत विकसित करत आहे तर आम्हाला त्याकरीता आता सुमारे 36 ते 60 महिन्यांचा अवधी लागतो आहे.
उशिरा होणाऱ्या अंतिम समयी बदलामुळे 57 टक्के निर्मात्यांना पुन्हा निर्मिती कामाकडे लक्ष देऊन त्याकरीता जास्त वेळ द्यावा लागतो आहे. याचा वेळेवर गाडी वितरण करण्यात अडथळे आणण्यात परिणाम होतो आहे. तसेच 43 टक्के जणांना खर्चातही वाढीचा अनुभव येतो आहे. अपेक्षीत दर्जा राखतानाच खर्चाचे व्यवस्थापन करताना ऑटो निर्मात्यांना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. यातून वाहन वितरण विलंब व त्यामुळे लाँचिंगवरही परिणाम होतो आहे. जागतिक ऑटो क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरणात अशी परिस्थिती उदभवल्याने निर्मात्यांची चिंता वाढलेली आहे.









