खासगी कॉलेजना 7.5 टक्के फी वाढीची परवानगी : विद्यार्थ्यांसह पालक वर्गात चिंता
प्रतिनिधी/ बेळगाव
खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फी वाढीचा फटका बसणार आहे. यावर्षी 7.5 टक्के खासगी कॉलेजमध्ये फी वाढ करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. आधीच खासगी इंजिनिअरिंग कॉलेजची फी भरमसाठ असताना त्यात पुन्हा वाढ करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालक वर्ग चिंतेत आहे.
इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठीचा खर्च परवडत नसल्याने संस्था चालकांनी 15 टक्के फी वाढ करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. उच्च शिक्षणमंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी कर्नाटका अनअॅडेड प्रा. इंजिनिअरिंग कॉलेज असोसिएशनसोबत बैठक घेतली. या बैठकीत खासगी इंजिनिअरिंग कॉलेजची 7.5 टक्के फी वाढ करण्याबाबत निश्चिती करण्यात आली. 2024 मध्ये 10 टक्के फी वाढ करण्यात आली होती. परंतु खासगी इंजिनिअरिंग कॉलेजने 15 टक्क्यापर्यंत फी वाढ केल्याचे समोर आले होते.
खासगी कॉलेजमधील सरकारी कोट्यासाठी 2023 मध्ये 96574 रुपये फी आकारण्यात येत होती ती आता 1 लाख 14 हजार 199 रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोमडेक फी स्ट्रक्चरनुसार टाईप 1 कॉलेजमध्ये 2 लाख रुपये तर टाईप 2 कॉलेजमध्ये 2.8 लाख रुपये फी आकारण्यात येणार आहे.
फी वाढ करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांची होणार अडचण
नुकत्याच बारावीच्या परीक्षा संपल्या असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड सुरू आहे. मेडिकल व इंजिनिअरिंग या दोन क्षेत्रांना विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती आहे. इंजिनिअरिंगमधील कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक या शाखांना विशेष मागणी आहे. त्यामुळे प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू असून, त्यात आता फी वाढ करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे.









