कोल्हापूर :
नाल्यातील पाणी तुंबून गांधी मैदानात साचावे यासाठी काहींनी कटकारस्थान केली जात आहे. पोती, गाद्या, बकेट टाकून पाणी थांबवण्याचा प्रकार केला आहे. अशा हिन दर्जाचे सुपारी घेवून राजकारण करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. संबंधितावर पोलिसा प्रशासनकडून तातडीने कारवाई करावी, असे पत्र महापालिका प्रशासनाला दिले आहे. तरी पोलिसांनी समाजकंटकावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली आहे.
क्षीरसागर म्हणाले, वास्तविक गांधी मैदानात शिवाजी पेठेसह लगतच्या पेठेतील हजारो खेळाडू खेळत असतात, सराव करत असतात. यामुळेच तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 कोटींचा निधी विशेषबाब म्हणून तातडीने मंजूर केला. यातून नवीन नाला करण्याचे काम सुरू असून याला अडथळा निर्माण केला जात आहे. पाणी कसे तटेल आणि काम चुकीच्या पद्धतीने झाले हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाण्याचा निचरा होत असल्याचे दिसूनही असा प्रकार करतात. यामुळे जनतेलाच त्रास होत असून हे घाणेरडे राजकारण असून यास काही मर्यादा असल्या पाहिजेत. हीन दर्जाचे कृत्याचा आपण निषेध करतो.
मैदानाचे चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याबाबत आरोप होत असल्याबाबत विचारले असता क्षीरसागर म्हणाले, मैदानातून नाला गेला असून दरवेळी पावसात गांधी मैदान पाण्याने भरतो.यामुळेच नाला वळविण्यासाठी महापालिकेने 5 कोटींच्या कामांचा डिपीआर केला असून त्याला निधी देण्याचे काम आपण केले आहे. या यंत्रणेमध्ये खो आणण्याचे काम काहींकडून होत आहे.
हद्दवाढीबाबच विचारले असता क्षीरसागर म्हणाले, 61 वर्ष हद्दवाढ झालेली नसल्याने विधानसभेच्या दारात उपोषणाला बसलो. यासंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय झाला होता. परंतू हद्दवाढीच्या विरोधातील काहींनी यामध्ये अडकाठी आणली. आता पूर्ण ताकदीने हद्दवाढीसाठी प्रयत्न करत आहे. मंत्रालयाच्या पातळीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधीची बैठक झाली आहे. हद्दवाढीसंदर्भात एका निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो आहेत.
- हद्दवाढीसाठी नेत्याचे एकमत, लवकरच निर्णय
कोल्हापूरच्या विकासकामांसाठी हजारे कोटींचा निधी मिळाला आहे. केशवराव भोसले नाट्यागृह कन्व्हेशन सेंटर, रंकाळा, स्ट्रॉम वॉटरच्या कामांचा समवेश आहे. त्यामुळे हद्दवाढीबाबत प्रस्तावित गावातील ग्रामस्थांचा गैरसमज दूर करावा लागेल. सर्वांना विश्वासात घेवून एकमत करून हद्दवाढ करण्याचा मानस आहे. नेत्याचे एकमत झाले असून लवकरच यावर निर्णय होईल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला. हद्दवाढीसाठी निवडणुकांवर बहिष्कार टाकणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
- शिवाजी पेठेतील जनता योग्य वेळी उत्तर देईल
एकीकडे पाणी तुंबवायचे आणि दुसरीकडे चुकीच्या पद्धतीने निधी खर्च होतो असे म्हणणे योग्य नाही. लोकांना सत्य स्थिती माहिती आहे. लवकरच ही सर्वांसमोर येईल. शिवाजी पेठेतील जनता संबंधितास योग्य वेळी उत्तर दिल्याशिवाय राहणार नसल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.
- हद्दवाढीबाबत ग्रामस्थांमध्ये गैरसमज पसरविला जात आहे
ज्यांची हद्दवाढ झाली त्यांचा विकास झाला आहे. सुविधा मिळणार असून जमिनेचे भाव वाढणार आहेत. ग्रामिण जनतेने हा फायदा लक्षात घेतला पाहिजे. कोणतरी त्यांना चुकीचे फिडींग करत असल्याचा संशयही क्षीरसागर यांनी व्यक्त केला.








