म्हापसा : सेंट फ्रान्सिस झेवियर हे तमाम गोमंतकीयांचे श्रद्धास्थान सायब आहेत. दरवर्षी होत असलेल्या त्यांच्या नोव्हेना तसेच फेस्ताला ख्रिश्चन बांधवांबरोबरच हिंदू तसेच इतर धर्मीय मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. अशा संताच्या बाबतीत अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या सुभाष वेलिंगकर यांना तत्काळ अटक झालीच पाहिजे. त्यांना अटक करण्याचे आश्वासन मला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याचे शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी सांगितले. शिवोली येथील आपल्या कार्यालयात शनिवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दरम्यान, प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल आदर हा असलाच पाहिजे परंतु इतर धर्माचा आदर करणेही तितकेच गरजेचे असल्याचे मत लोबो यांनी मांडले.
धार्मिक सलोखा बिघडविणाऱ्यांबाबत कायदा अंमलात आणा
धार्मिक सलोखा बिघडविणाऱ्यांबाबत येत्या विधानसभेत याबाबत नवीन कायदा अंमलात आणणे गरजेचे आहे, असे मतही लोबो यांनी मांडले. दुसऱ्या धर्माबाबत असे अपप्रचार व अपशब्द बोलणाऱ्या इसमाला 50 हजार, पुन्हा बोलल्यास 1 लाखापेक्षा अधिक दंड द्यायला हवा, असे मत लोबो यांनी मांडले.