‘मिशन मार्कंडेय’ची मागणी
बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीला ऊर्जितावस्था आणावी. बैलूरपासून काकतीपर्यंत नागमोडी वळणांद्वारे वाहणाऱ्या या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने नदीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे या नदीला ऊर्जितावस्था आणावी, अशी मागणी ‘मिशन मार्कंडेय’चे प्रमुख जयवंत साळुंके यांनी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ग्रामीण भागासह बेळगाव शहरात जोराचा पाऊस झाला की, मार्कंडेय नदीला पूर येतो. त्यामुळे काठावरील सर्व माती वाहून नदीत जाते. पूर ओसरल्यानंतर ही माती नदीमध्ये तशीच राहते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी नदीचे पात्र अरुंद झाले आहे. नदीला पूर येऊन शेतीमध्ये पाणी शिरत आहे.
सर्वेक्षण करून नदीची रुंदी-खोली वाढविणे गरजेचे
नदीचे मूळ स्वरुप मिळविण्यासाठी सर्वेक्षण करून नदीची रुंदी व खोली वाढविणे गरजेचे आहे. तसेच 500 मीटरवर छोटे बंधारे घालावेत, जेणेकरून पाणी जमिनीत जाऊन भूजल पातळी वाढेल. त्यामुळे सरकारने या नदीपात्रातील गाळ काढण्यासह रुंदी वाढवावी, अशी मागणी केली. यावेळी सदस्य पवन देसाई उपस्थित होते.









