नदी-नाले तुडुंब, शेतकऱ्यांना दिलासा : पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या तीन दिवसांपासून आगमन झालेल्या पावसाने शनिवारी सकाळी तर शहरासह ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शनिवार असल्यामुळे शाळा सकाळच्या होत्या. त्यामुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांची या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. पावसाचा जोर इतका होता की रेनकोट आणि छत्री घेऊनदेखील काहीच उपयोग झाला नाही. भिजतच शाळा गाठावी लागली.
शुक्रवारीही सकाळच्या सत्रामध्ये दमदार पाऊस कोसळला. त्यानंतर दुपारी पावसाने उसंत घेतली होती. पाऊस कमी होईल, असे वाटत असताना शनिवारी पहाटेपासूनच दमदार सुरुवात झाली. या पावसामुळे साऱ्यांनाच दिलासा मिळाला. मात्र विद्यार्थ्यांसह बाजारासाठी आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचून होते. सकाळी 10 नंतर मात्र पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. या पावसामुळे शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचे दिसून आले.
आठ दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे. पिकांना जीवदान मिळाले तर पाणी समस्याही सुटण्याच्या मार्गावर आहे. मात्र या पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील शेकडो एकरमध्ये पाणी साचून राहिले आहे. याचबरोबर मार्कंडेय नदीच्या परिसरातील शिवारातही पाणी शिरले आहे. त्यामुळे बळ्ळारी नाला व मार्कंडेय नदीकाठावरील शिवाराला काहीसा फटका बसला आहे.
शनिवारी बेळगावचा बाजार भरला जातो. त्यामुळे जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातूनही खरेदीसाठी नागरिक येत असतात. बकरी बाजार, जनावरांचा बाजार याचबरोबर बाजारपेठेमध्येही धान्य घेऊन विक्रीसाठी नागरिक येत असतात. त्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. पाऊस असल्यामुळे खरेदीदारांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल मंदावली होती. दुपारनंतर पाऊस काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे खरेदीदार व व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला.
या पावसामुळे शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. सखल भागांमध्ये पाणी साचून होते. त्यामधून वाहने जाताना पाणी इतर ये-जा करणाऱ्या वाहनांवर व पादचाऱ्यांवर शिंथडत होते. या पावसामुळे नदी-नाले प्रवाहीत झाले आहेत. नालेदेखील तुडुंब भरून वाहत आहेत. मार्कंडेय नदीही दुथडी भरून वाहत असून कंग्राळीजवळील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. सध्या पावसाने चांगली साथ दिली आहे. जिल्ह्यातील जलाशयांतील पाणीसाठ्यामध्येही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात नद्यांना पाणी
जिल्ह्यातील मलप्रभा, घटप्रभा, कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी या नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येत असून कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात या नद्यांना पाणी येत असल्यामुळे यावर्षीही काही गावांना फटका बसणार आहे.









