कर्करोगाच्या गाठी अलग करणे-आपत्कालीन रक्तस्राव थांबविणे शक्य
बेळगाव : केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोइंट्रॉलॉजी विभागात ‘एंडोस्कोपी अँड अल्ट्रासाऊंड’चे (ईयुएस) निदान करणारी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याचे उद्घाटन एंडोस्कोपी तज्ञ डॉ. अमित मायदेव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, गॅस्ट्रोइंट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. संतोष हजारे, डॉ. एम. व्ही. जाली उपस्थित होते. केएलई हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सोयीच्यादृष्टीने एकाच छताखाली सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यकृतासह अवयव प्रत्यारोपण केंद्र येथे कार्यान्वित असून अत्याधुनिक यंत्रांमुळे आजारांचे निदान लवकर होण्यास मदत होते. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कोरे यांनी केले. ईयुएसमुळे कर्करोगाच्या गाठी अलग करणे व अंतर्गत रक्तवाहिन्यांमधून आपत्कालीन रक्तस्राव थांबविणे शक्य होणार असल्याचे डॉ. संतोष हजारे यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. राजेश पोवार, डॉ. सुदर्शन चौगला, डॉ. राजशेखर सोमनट्टी उपस्थित होते.









