‘आत्मनिर्भर’तेच्या दिशेने भारताचे मोठे यश, संशोधकांची सर्व स्तरांमधून प्रशंसा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत बायोटेकने कोरोनावर शोधलेल्या स्वदेशनिर्मित ‘नस्यलसी’ला केंद्र सरकारच्या औषध नियंत्रण प्राधिकारणाने (डीसीजीआय) तातडीच्या उपयोगासाठी मान्यता दिली आहे. ही लस सुईविना नाकातून शरीरात पोहचविली जाते. त्यामुळे तिला ‘नस्यलस’ असे संबोधले गेले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती त्यांच्या एका ट्विटर संदेशाद्वारे दिली आहे. ही लस शोधण्यात अमेरिकेच्या अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या सेंट लुईस विद्यापीठाचे काही प्रमाणात साहाय्य घेण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
भारतीय संशोधकांच्या या महत्वाच्या यशामुळे भारताचे वैद्यकीय क्षेत्रात ‘आत्मनिर्भरते‘च्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. ही लस 18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला दिली जाऊ शकते. या लसीमुळे कोरोनाविरोधातील भारताच्या एकत्रित संघर्षाला फार मेठे बळ मिळाले आहे. या संशोधनाचे दूरगामी परिणाम होणार आहेत, असे आरोग्यमंत्री मांडविया यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे .
कोरोनाचा पराभव करु
कोरोनाविरोधात भारताने केवळ विदेशी तंत्रज्ञान आणि औषधोपचारांवर अवलंबून न राहता, स्वदेशी विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसीत करण्याचा सातत्याने प्रयत्न चालविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने आम्ही यात यशस्वी होत आहोत. विज्ञानाचा आधार आणि सर्वांचा प्रयास याच्या साहाय्याने आम्ही भविष्यकाळात प्रगतीपथावर अग्रेसर राहू, कोरोनाचा निश्चितपणे पराभव करु, असा ठाम विश्वास डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या महिन्यातच प्रतिपादन
हैदराबाद येथील सार्वजनिक क्षेत्रातील भारत बायोटेक या लस आणि औषधनिर्मिती कंपनीने गेल्या महिन्यातच नस्यलस यशस्वी झाल्याचे प्रतिपादन केले होते. या लसीवरील सर्व परीक्षणे आणि चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे ही लस मानवांसाठी अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित आहे, असे या कंपनीने स्पष्ट केले होते. केंद्रीय औषध नियंत्रण प्राधिकरणाने आता या लसीला तातडीच्या उपयोगासाठी मान्यता दिल्याने कंपनीचे प्रतिपादन सत्य ठरले आहे.
तिसऱया चाचणीतही यश
या लसीवर तिसऱया स्तरातील चाचणीही अत्यंत यशस्वी ठरली आहे. ती साधारणतः 4,000 स्वयंसेवकांच्या साहाय्याने घेण्यात आली आहे. या लसीचे तांत्रिक संबोधान बीबीव्ही154 असे आहे. नाकाद्वारे ही लस देण्याची यंत्रणाही भारतातच निर्माण करण्यात आली असून ती कमी खर्चात उपलब्ध आहे. भारतातील मध्यम आणि कनिष्ठ उत्पन्न वर्गाची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन ही लस आणि ती देण्याची यंत्रणा तयार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
लसीची रचना कशी आहे ?
ही लस ‘रीकाँबिनंट ऍडनोव्हायरल व्हेक्टर्ड कन्स्ट्रक्सस्’ पद्धतीने विकसीत करण्यात आली असून वैद्यकपूर्व चाचण्यांमध्ये ती यशस्वी ठरली. वैद्यकपूर्व सुरक्षितता, परिणामकारकता, मोठय़ा प्रमाणात उत्पादन करण्याची शक्यता आणि निर्मिती सुलभता, लस शरिरात सोडणे आणि ती ग्राहकांपर्यंत पोहचविणे या सर्व निकषांवर ती उत्तररित्या खरी उतरली आहे, असे प्रतिपादन कंपनीने केले आहे.