आफ्रिकेचे ब्लादिमीर पुतीन यांना आवाहन
वृत्तसंस्था/ सेंट पीटर्सबर्ग
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांची भेट घेतल्यावर आफ्रिकन नेते शनिवारी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे पोहोचले. तेथे त्यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आहे. पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीदरम्यान दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी युक्रेनमधील युद्ध कुठल्याही स्थितीत थांबविले जावे असे म्हटले आहे.
या युद्धाचा आफ्रिकन देशांवर अत्यंत वाईट प्रभाव पडत आहे. हे युद्ध कूटनीति आणि चर्चेद्वारे समाप्त केले जावे. दोन्ही देशांनी परस्परांच्या युद्धकैद्यांची मुक्तता करावी आणि रशियाने युक्रेनमधून आणलेल्या मुलांना परत त्यांच्या घरी पाठवावे असे रामाफोसा यांनी पुतीन यांना उद्देशून म्हटले आहे.
युक्रेनमधील मुले घाबरलेली आहेत, रशिया या मुलांचे रक्षण करत आहे. या मुलांना युद्धापासून दूर ठेवण्यासाठी आणि एका उज्ज्वल भवितव्यासाठी युद्धभूमीवरून हटविण्यात आल्याचा दावा पुतीन यांनी केला आहे. आम्ही युक्रेननसोबत चर्चेस तयार आहोत, परंतु युक्रेनच युद्ध रोखण्यासाठी चर्चा व्हावी या मताचा नसल्याचे पुतीन म्हणाले.
हे युद्ध कधी न कधी संपवावे लागेल. कुठलेच युद्ध कायमस्वरुपी लढता येत नाही. हे युद्ध संपविले जावे असा स्पष्ट संदेश घेऊन मी सर्व आफ्रिकन नेत्यांसोबत रशियात आलो असल्याची भूमिका रामाफोसा यांनी मांडली आहे. याकरता त्यांना 10 सूत्री शांतता प्रस्तावही सादर केला. युद्धामुळे युक्रेनमधून होणाऱ्या धान्य निर्यातीवर प्रतिकूल प्रभाव पडला आहे, तसेच रशियाकडून खतांची निर्यात योग्यप्रकारे होऊ शकलेली नाही. याचा सर्वाधिक फटका आफ्रिकन देशांनाच बसला आहे.
पुतीन यांच्याकडून कौतुक
पुतीन यांनी बैठकीदरम्यान आफ्रिकन देशांच्या तटस्थ भूमिकेचे कौतुक केले आहे. रशियापूर्वी 7 आफ्रिकन देशांचे नेते युक्रेनच्या दौऱ्यावर पोहोचले हेते. या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, इजिप्त, कोमोरोस, सेनेगल, झाम्बिया, यूगांडा आणि रिपब्लिक ऑफ काँगोचा समावेश आहे. युद्ध रोखून युक्रेन अन् रशियादरम्यान तडजोड घडवून आणण्याचा या देशांचा उद्देश आहे.
झेलेंस्कींनी फेटाळला प्रस्ताव
आफ्रिकन नेत्यांनी झेलेंस्की यांनाही युद्ध रोखण्याचे आवाहन केले होते. युद्धासंबंधी युक्रेनच्या भावना अन् भूमिका जाणतो, परंतु सध्या हे युद्ध रोखणे सर्वात आवश्यक असल्याचे आफ्रिकन नेत्यांनी म्हटले होते. रशियाचे सैन्य जोपर्यंत युक्रेनच्या भूभागातून परतत नाही तोवर त्याच्यासोबत कुठलीच चर्चा होऊ शकत नाही. रशियाने आमचा भूभाग परत केल्यावरच हे युद्ध थांबणार आहे. आफ्रिकन नेत्यांच्या शांतता प्रस्तावातील तरतुदी निरर्थक असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे. आफ्रिकन नेते युक्रेनमध्ये पोहोचल्यावरच रशियाने कीव्ह शहरावर अनेक हल्ले केले होते. पूर्ण कीव्हमध्ये अनेक तासांपर्यंत सायरन्स वाजत होते.









