वृत्तसंस्था/ ऑकलंड
पात्रता फेरीतून आलेल्या स्पेनच्या रेबेका मासारोव्हाने महिलांच्या एएसबी टेनिस क्लासिक स्पर्धेत द्वितीय मानांकित अमेरिकेच्या स्लोअन स्टीफेन्सचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आणले. पावसाचा व्यत्यय आल्याने स्पर्धा आयोजकांना एकेरीचे सामने दुसऱया दिवशी आयोजित करावे लागले.
पावसामुळे पहिल्या फेरीचे सामने रखडल्याने इनडोअरमध्ये आणि प्रेक्षकांशिवाय सामने खेळविण्यात आले. इनडोअर स्टेडियमवर ऍडजस्ट करणे कठीण गेल्याने स्टीफेन्सला संघर्ष करावा लागला. तिला 130 व्या मानांकित मासारोव्हाकडून केवळ दोन तासांत पराभव स्वीकारावा लागला. आदल्या दिवशी अर्धवट राहिलेला हा सामना दुसऱया दिवशी पुढे खेळविण्यात आला होता. अन्य सामन्यात माजी ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सोफी केनिनलाही पराभवाचा धक्का बसला. चीनच्या वांग झिनयूने तिला 7-6 (8-6), 6-3 असे हरविले. झिनयूची दुसऱया फेरीची लढत अग्रमानांकित अमेरिकेच्या कोको गॉफशी होणार आहे. अमेरिकेची आणखी एक खेळाडू लॉरेन डेव्हिसने स्लोव्हेनियाच्या तमारा झिडान्सेकचा 6-2, 6-1 असा पराभव केला. तिची पुढील लढत सातव्या मानांकित डन्का कोविनिचशी होणार आहे. कोविनिचने जपानच्या नाओ हिबिनोचा 6-1, 6-4 असा पराभव केला









