महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ : दर्शनासाठी भक्तांची अमाप गर्दी
वार्ताहर /सांबरा
श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या 118 व्या पुण्यतिथी उत्सवाची बुधवारी उत्साहात सांगता झाली. दरम्यान बुधवारी आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी सहापर्यंत महाप्रसाद वाटपाचे काम सुरू होते. बुधवारी सकाळपासूनच महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी आमराईत गर्दी केली होती. दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे पूजन झाल्यानंतर महाप्रसाद वाटपाला सुरुवात करण्यात आली. महाप्रसाद घेतल्यानंतर परगावचे भक्त परतीच्या मार्गाला लागले. जितके भाविक जात होते तितकेच भाविक महाप्रसाद घेण्यासाठी पंत बाळेकुंद्रीत दाखल होत होते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर रहदारीची कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना व स्वयंसेवकांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. दुपारी तीननंतर गर्दी काहीशी कमी झाली. त्यानंतर टिपरीचा कार्यक्रम झाला. यावेळी सामूहिकरीत्या टिपऱ्या खेळून श्री पंतांचे स्मरण करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता श्रींची पालखी आमराईतील पूज्यस्थानी जाऊन गावातील वाड्यात पोहोचली व उत्सवाची सांगता झाली. दरम्यान तीन दिवस चाललेल्या पुण्यतिथी उत्सवामध्ये कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी श्री पंतांचे दर्शन घेतले.









