पुढील 48 तास कडक निर्बंध
खानापूर : खानापूर मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सोमवारी सायंकाळी 6 वाजता सांगता झाली. यानंतर पुढील 48 तास कडक निर्बंध लागू करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांनी दिली. विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराची सांगता सोमवारी सायंकाळी झाली असून मंगळवार मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र मतदारांना प्रलोभन, आमिषे दाखवणे, पैसे वाटणे, मद्यपान, जेवणावळी यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच संवेदनशील अतीसंवेदनशील मतदार क्षेत्रात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रातील सर्व मतदानाची चोख व्यवस्था करण्यात आली असून मतदान केंद्रांवर अधिकारी पोचवणे तसेच मतदान झाल्यावर मतपेटी किंवा मतदान यंत्रणा पुन्हा पोलीस बंदोबस्तात आणण्यात येणार असून मतदान यंत्रे येथील सिद्धिविनायक हायस्कूलमध्ये ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर मतमोजणीसाठी ही मतदान यंत्रे बेळगावला पाठविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.









