वृत्तसंस्था /अहमदाबाद
गुजरातच्या अहमदाबाद येथे इस्कॉन ब्रिजवर बुधवारी रात्री उशिरा जग्वार कारने सुमारे 25 जणांना चिरडले आहे. यातील 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल आणि होमगार्ड जवान सामील आहे. कारने दिलेली धडक जोरदार असल्याने लोक 30 फूट अंतरापर्यंत जाऊन कोसळले होते. कार अन् डंपरच्या दुर्घटनेनंतर रस्त्यावर जमलेल्या लोकांसोबतच ही भीषण दुर्घटना घडली आहे. ओव्हरब्रिजवर महिंद्रा थार एका डंपरला मागून धडकली होती. या वाहनांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तेव्हा दुसरीकडून 160 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने आलेल्या जग्वार कारने लोकांना चिरडले. मृतांमध्ये बोटाद अन् सुरेंद्रनगर येथील युवक सामील आहेत. या घटनेत 6 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर इतरांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या दुर्घटनेत जग्वार कारचा चालकही जखमी झाला असून उपचारानंतर त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती वाहतूक पोलीस आयुक्त एस.जे. मोदी यांनी दिली आहे. जग्वार कार तथ्य पटेल चालवत होता आणि त्याचे वय सुमारे 18-19 वर्षे इतके आहे. दुर्घटनेनंतर आरोपी चालकाचे कुटुंब गायब झाले आहे. जग्वार कारमध्ये आणखी एक मुलगा आणि मुलगी होती. घटनास्थळी उपस्थित जमावाने त्यांना मारहाण केली. परंतु काही लोकांनी त्यांना वाचवून रुग्णालयात हलविले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तर जखमी लोकांना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.









