मिरज :
मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासह संपूर्ण परिसर अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्याचे निदर्शनास येताच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. त्यानंतर महापालिका मिरज कार्यालयाकडील सहायक आयुक्तांसह अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री बारा वाजता एकाचवेळी 13 अतिक्रमणांचा सुपडासाफ केला.
मिरज शासकीय रुग्णालय परिसरात अतिक्रमणांच्या गराड्यात सापडला आहे. प्रवेशद्वाराजवळ अतिक्रमणे थाटल्यामुळे रुग्णवाहिनीलाही आत जाण्यास रस्ता मिळत नाही. यापूर्वी सिव्हील प्रशासनाने तक्रार केल्यानंतर महापालिकेने तात्पुरती कारवाई केली होती. काही अतिक्रमणांचा सांगाडा जप्तही केला होता. त्यानंतरही येथे अतिक्रमणे सुरूच होती. काही दिवसांपासून विविध व्यवसायिकांनी हातगाडीसह मोठे टेबल ठेवून तसेच छत माऊन दुकाने थाटली होती. याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते.
सोमवारी येथील अनेक विकासकामांचा शुभारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदारांसह विविध अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. सिव्हील प्रशासनाकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असताना ऊग्णालयाबाहेरील अतिक्रमणांमुळे विद्रुपीकरण झाले होते.

मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा कार्यक्रमस्थळी जाताना मंत्री मुश्रीफ यांची नजर या अतिक्रमणांवर पडली. उद्घाटनानंतर त्यांनी स्वीय सहाय्यकाला सांगून महापालिका आयुक्तांना दूरध्वनी केला. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील ऊग्णांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या शासकीय ऊग्णालयाचा परिसर अतिक्रमणात अडकल्याबाबत जाब विचारला. त्यानंतर मात्र महापालिका अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. आयुक्त सत्यम गांधी यांनी रात्री 12 वाजताच सहायक आयुक्त अनिस मुल्ला यांना सुचना देऊन तातडीने अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सहायक आयुक्तांनी अतिक्रमण विभाग प्रमुख सचिन सागावकर यांच्यासह डझनभर कर्मचाऱ्यांची फौज घेऊन अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली. रातोरात सिव्हील समोरील 13 अतिक्रमणे पाडून त्याचा सांगाडाही जप्त केला.
नेहमी अतिक्रमण हटावचा फार्स करणाऱ्या महापालिकेला मंत्र्यांच्या आदेशाने झोपेतून जागे केले. सिव्हील हॉस्पिटलसमोर अनेक वर्षांपासून अशी अतिक्रमणे होताना महापालिकेने ठोस उपाययोजना केल्या नव्हत्या. परिणामी बेकायदेशीर अतिक्रमणांनी हातपाय पसरले होते. अखेर मंत्र्यांनीच अतिक्रमणांची दखल घेतल्यामुळे शासकीय ऊग्णालय परिसराने मोकळा श्वास घेतला.








