पावसाळ्यापूर्वी नाले, गटारी स्वच्छ करण्याचा निर्णय : मनपाची मान्सूनपूर्व खबरदारी बैठक, विविध प्रभागांना भेटी देऊन समस्या जाणून घ्याव्यात
बेळगाव : यंदा पावसाळ्यात शहरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना विश्वासात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, त्याचबरोबर नाले, गटारी, ड्रेनेज समस्या सोडविण्यासाठी अधिक प्राधान्य द्यावे. शहराच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी जिभेवर साखर आणि डोकीवर बर्फ ठेवून शांत डोक्याने काम करावे, असा सल्ला महापौर मंगेश पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला. तसेच येत्या सोमवारपासून नाले व गटारीवरील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. महापालिकेच्या मुख्य सभागृहात बुधवारी सायंकाळी मान्सूनपूर्व खबरदारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर मंगेश पवार होते. व्यासपीठावर उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी., सत्ताधारी गटनेते अॅड. हनुमंत कोंगाली, विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी होते. यंदा जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असल्याने शहरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना हाती घ्याव्यात याबाबत मते मांडण्याची सूचना नगरसेवकांना करण्यात आली. त्यावर 58 प्रभागांमधील नगरसेवकांनी विशेष करून नाले व गटारींची सफाई त्याचबरोबर ड्रेनेज समस्या मांडली. प्रभाग क्र. 52 मध्ये ड्रेनेज तुंबलेले आहेत.
त्याचबरोबर वीज वाहिन्या खाली आलेल्या आहेत. गटारी देखील नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे तातडीने याकडे लक्ष घालून समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. नगरसेवक गिरीश धोंगडी म्हणाले, शहरातील गटारींवर अतिक्रमण करण्यात आले असल्याने सफाई करणे अवघड झाले आहे. एक मजल्याचा बांधकाम परवाना घेऊन काही जणांनी बहुमजली इमारती बांधल्या आहेत. गटारीवर तसेच पदपथांवर अतिक्रमण केलेल्यांना हटविण्यात यावे. खडेबाजार शहापूरमध्ये चेंबरवर काँक्रिट घालण्यात आले असून संबंधितांना नोटीस द्यावी. दक्षिण भागासाठी सकिंग मशीन द्यावी, अशी मागणी केली.
गढूळ पाणी रस्त्यावर
नगरसेवक शंकर पाटील म्हणाले, रामदेव गल्लीतील गटारी नादुरुस्त झाल्या असून गटारीवर अतिक्रमण झाले आहे. अनेकवेळा सांगून देखील काम सुरू झालेले नाही. दरवर्षी सरदार्स मैदानावर पावसाचे पाणी तुंबते, त्यामुळे त्याठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्यांकडून संरक्षण भिंतीला भगदाड पाडण्यात आले आहे. त्यामुळे गढूळ पाणी रस्त्यावर येत असून त्याठिकाणी गटारी नसल्याने परिसरातील विहिरी व कूपनलिकांचे पाणी गढूळ होत आहे. त्यामुळे त्याठिकाणी गटार व्यवस्था करून देण्यात यावी. केळकर बागेतील नाला बंद झाला आहे. तो कशा पद्धतीने स्वच्छ करता येईल त्याकडे लक्ष द्यावे. गटारीमध्येच नवीन घरांच्या बांधकामाचे साहित्य पडले आहे. ते हटविण्यात यावे, अशी मागणी केली.
प्रभाग क्र. 22 मधील संभाजी रोड, ओल्ड पी. बी. रोड अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आला आहे. त्यामुळे त्याठिकाणी अपघात घडत आहेत. त्यामुळे एका तरुणाचा बळी गेला आहे. रस्ता व्यवस्थित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रभाग क्र. 12 मध्ये असदखान सोसायटी येथील चेंबर फुटले आहे. नाल्याचे पाणी शिवाजीनगर येथील घरांमध्ये शिरत आहे. वैभवनगर, न्यू वैभवनगर, पावसाबरोबरच ड्रेनेजचे पाणी घरामध्ये शिरत आहे. बुडा कार्यालयानजीक एका हॉटेलचे ड्रेनेज पाणी रस्त्यावर सोडण्यात आले आहे, अशी तक्रार करण्यात आली. प्रभाग क्र. 53 मधील समस्यांची अधिकारी पाहणी करत आहेत. मात्र प्रत्यक्षात त्या सोडविल्या जात नाहीत. त्यामुळे मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना अधिकार द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
समस्या सोडविण्याचे आश्वासन
सरकार नियुक्त सदस्य रमेश सोंटक्की म्हणाले, मनपा आयुक्तांना बेळगावच्या पावसाळ्याबद्दल माहिती नाही. इतर शहरांप्रमाणे येथील पाणी वाहून जात नाही. एखादी समस्या सभागृहात मांडल्यास आयुक्त तातडीने स्वत: जाऊन पाहणी करतात. यापूर्वीचे आयुक्त, महापौर, उपमहापौर विविध प्रभागांना भेटी देऊन समस्यांची पाहणी करत होते. त्याचप्रमाणे तुम्ही देखील दररोज वेगवेगळ्या प्रभागांना भेटी देऊन समस्या जाणून घ्याव्यात. छत्रपती शिवाजी उद्यानाजवळील नाल्याची अद्यापही सफाई झालेली नाही. अशी तक्रारही यावेळी त्यांनी केली. सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर मनपा आयुक्त व अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले.
विनापरवाना बांधकामे वाढल्याची तक्रार
शहरात बेकायदा इमारती बांधण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत तक्रार करून देखील सेक्शन ऑफिसर्स कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत. एखाद्या ठिकाणची माहिती दिल्यास संबंधितावर कारवाई करण्याऐवजी तक्रार करणाऱ्याचे नाव सांगितले जाते. त्याचबरोबर लेखी तक्रार द्या, कारवाई करू असे सांगितले जात असल्याने विनापरवाना बांधकामे वाढली आहेत अशी तक्रार काही नगरसेवकांनी केली. त्यावेळी संतापलेल्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी सेक्शन ऑफिसर्सना बैठकीत उभे करून एखादे बेकायदा बांधकाम होत असेल तर ते प्लिंथ लेवलच बंद करावे, अशी सूचना केली. तसेच मनपा आयुक्तांनी कोणाच्याही तक्रारीची वाट न पाहता सेक्शन ऑफिसर्सनी सुमोटो तक्रार दाखल करून कारवाई करावी, अशी सूचना केली.









