अनेक विक्रेत्यांचे साहित्य जप्त : मनपाकडून अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र : रस्त्याने घेतला मोकळा श्वास
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांवर अतिक्रमण करून व्यवसाय थाटण्यात आले आहेत. त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याविरोधात आता महापालिकेने कठोर पावले उचलली असून एपीएमसी रोड, हनुमाननगर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. गुरुवारी हिंडलगा रोडवरील विनायकनगर परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा उगारण्यात आला आहे.
विनायक मंदिरामागे व परिसरात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनेकजण ठाण मांडून बसले होते. त्यामुळे या मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण झाला होता. याची दखल घेत गुरुवारी अनेक खोके हटविण्यात आले. याचबरोबर अनेक गाड्याही रस्त्यावर लावण्यात आल्या होत्या. त्या गाड्याही हटविण्यात आल्या. काहीजणांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पदपथावरून ये-जा करणेदेखील अडचणीचे ठरत आहे. बेळगाव-वेंगुर्ला रोड हा वर्दळीचा रोड म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली. अनेक व्यापाऱ्यांनी बऱ्याच दिवसांपासून याठिकाणी ठाण मांडले होते. हारविक्रेते, नारळविक्रेते, चहाटपरी तसेच इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. आता येथील अतिक्रमणे हटविल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिक्रमण हटविण्यात आले.









