महापालिका अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानक तसेच आरटीओपर्यंत रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. त्याबद्दल तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी सकाळी या परिसरातील रस्त्यावरील खोकी तसेच करण्यात आलेले अतिक्रमण हटविले आहे. मध्यवर्ती बसस्थानक ते आरटीओपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला टपरी थाटून व्यवसाय करत होते. त्यामुळे बऱ्याचवेळा वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली होती. पदपथावरच अनेकांनी व्यवसाय थाटले होते. त्यामुळे सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. यावेळी काही खोकीही जप्त करण्यात आली. दुकानांसमोर बांधण्यात आलेल्या अतिक्रमणावरही हातोडा मारण्यात आला. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मध्यवर्ती बसस्थानकाजवळील अतिक्रमणे हटविण्याची मागणी
अजूनही काहीजणांचे अतिक्रमण रस्त्यावर असून तेही हटवावे, अशी मागणी होत आहे. याचबरोबर मध्यवर्ती बसस्थानकाजवळही काहींनी ठाण मांडून व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तेव्हा तातडीने त्या परिसरातीलही अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.









