सांगली :
संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. पावसाळापूर्व नालेसफाईमध्ये मनपा क्षेत्रातील 85 पैकी 32 नैसर्गिक नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. या कामाला उशीर झालेला नाही. येत्या जुलैच्या आत पूरपट्ट्यातील सर्व अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे जमीनदोस्त करणार, अशी माहिती मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.
पुर परिस्थितीवेळी नागरिकांना वेळोवेळी पाणीपातळीबाबत माहिती देण्यात येणार असून नागरिकांनी पूर अथवा महापुराबाबत अफवावर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जावू नये, असे आवाहनही करण्यात आले. मनपा क्षेत्रातील 175 धोकादायक इमारतीवर लवकरच हातोडा घालणार आहे, असा इशारा आयुक्त गांधी यांनी दिला.
मनपा आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली आणि संभाव्य पूरपरिस्थितीबाबत चर्चा व नियोजन करण्यासाठी पालिकेच्या मंगलधाम येथील विभागीय कार्यालयात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक झाली. खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ व आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, स्मृती पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त बोलत होते.
मान्सूनपूर्व नियोजन व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खासदार, आमदारांनी मनपास उपयुक्त सूचना व माहिती दिली आहे. त्या सुचनांचा विचार करून पालिका प्रशासन संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे, असे सांगून आयुक्त म्हणाले, मनपा क्षेत्रातील 85 पैकी आतापर्यंत 32 नाल्यांची सफाई झालेली आहे. उर्वरित नाल्याचीही सफाई युद्धपातळीवर सुरू आहे. नालेसफाई काम वेळेत सुरू झालेले आहे. नैसर्गिक नाले आणि पुरपट्ट्यातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामाबाबत मनपा तोंडावर बोट ठेवून गप्प बसणार नाही.
सांगली, मिरज व कुपवाड शहरात मिळून तब्बल 175 धोकादायक इमारती आहेत. या इमारतींचे अ,ब,क,ड अशा चार गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या दिवसात अशा इमारती कोसळण्याच्या शक्यता अधिक असतात. त्यामुळे वर्गीकरणानुसार धोकादायक इमारतीवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. आपत्तीच्या काळात पालिकेच्या कंट्रोल रूमसह मनपा क्षेत्रातील सर्व ठिकाणांचे सीसीटीव्ही सुरू राहणार आहेत. संभाव्य पूरपरिस्थितीबाबत लोकांना 30 फुट, 40 फुट, 50 फुट अशा वेगवेगळ्या पातळीवरील पाणीपातळीसह इतरही माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेचे मोबाईल अॅप कार्यरत राहिल.
पूरग्रस्तांसाठी जेवण, औषधोपचारासह शाळा, तसेच मंगल कार्यालयाच्या ठिकाणी सर्व यंत्रणेसह सोय करण्यात येणार आहे. पालिकेने अशी 34 निवारा केंद्रे निश्चित केली आहेत. चार मदत केंद्रासह उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन यंत्रणा व बोटी, आरोग्य केंद्रे तयार असल्याचे सांगितले. आपत्तीकाळात महापालिकेचे सर्व दवाखाने कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आयुक्तांनी केले.
- आयुक्त म्हणतात
नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणाबाबत कारवाई सुरू केली आहे. नाल्यावर बांधकाम केलेल्या मिरजेतील एका डॉक्टरवर 50 हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कर्नाळ रोडसह पूरपट्ट्यातील रस्ते उंच करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. शामरावनगर येथील पाण्याच्या निचऱ्याबाबत तातडीने जी उपाययोजना करता येईल ती लगेचच आम्ही करत आहोत.








