आगीच्या घटनेनंतर पालिका एक्शन मोडवर. वाहन आत जाण्यासाठी रस्ता केला खुला
डिचोली : डिचोली बाजारात सहा दुकानांना आग लागण्याची घटना घडल्यानंतर नगरपालिकेला जाग आली आहे. नगरपालिकेने लगेच एक्शन मोडवर येताना फुल मार्केटच्या समोरील तसेच आग लागलेल्या गल्लीतील दुकानदारांनी रस्त्याच्या बाजूला केलेली अतिक्रमणे हटवली. काल सोम. दि. 9 ऑक्टो. रोजी सकाळीच सदर कारवाई नगरपालिकेने केली. यावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी, पालिका निरिक्षक गजानन परवार व इतरांची उपस्थिती होती. गेल्या गुरू. दि. 5 ऑक्टो. रोजी रात्री 10.25 वा. च्या सुमारास डिचोली बाजारातील सहा दुकानांना आग लागून मोठी हानी झाली. सहापैकी तीन दुकाने तर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले. यावेळी अआग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाचा बंब अरूंद रस्ते आणि त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे घटनास्थळी पोहोचू शकला नाही. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले.
या घटनेच्या वेळी घटनास्थळी जमलेल्या लोकांनी रस्त्याच्या बाजूला करण्यात येणाऱ्या अतिक्रमाणावर बोट धरले होते. बाजारात सर्वत्र रस्त्यावर अतिक्रमणे झाल्याने दररोजची वाहतूक सुरळीतपणे चालत नाही. आणि अशा प्रकारच्या आपत्कालीन समयी अग्निशामक दलाचा बंब किंवा इतर वाहने लागलीच बाजारात आणणे त्रासदायक ठरते. याच विषयावर मोठी चर्चा झाली. यावेळी उपस्थित आमदार डॉ. चंद्रकांत शेट्या? यांनीही या अतिक्रमणाबध्दल नगराध्यक्षांशी बोलणी करून बाजारतील सर्व अतिक्रमणे लवकरच हटवून रस्ता मोकळा करण्याची सुचना केली होती. त्यानुसार डिचोली नगरपालिकेने आपली प्रक्रिया सुरू केली होती. रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या तसेच छप्पर वाढवून रस्त्यावर आणलेल्या दुकानदारांना सदर सरवल अतिक्रमण हटविण्याची पूर्वसूचना दिली होती. अन्यथा नगरपालिका हटविणार, असे कळविले होते. परंतु सदर दुकानवाल्यांनी अतिक्रमणे हटवली नसल्याने अखेर डिचोली नगरपालिकेला कारवाई करावी लागली. काल सकाळी डिचोली नगरपालिकेने सदर सर्व अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला. दुकानांच्या बाहेर बांधण्यात आलेली ताडपत्रीची अच्छादने सुध्दा नगरपालिकेने हटवली. या लोंबकळणाऱ्या ताडपत्रीमुळेही आग लागल्यास ती फैलावण्याचा मोठा धोका असतो. त्यासाठी सदर ताडपत्री हटविण्यात आली.
वाहन येण्यासारखा रस्ता मोकळा केला
आगीच्या घटनेवेळी अग्निशामक दलाचा बंब आत येऊ न शकल्याने आग विझविण्याच्या कामात अडथळा आला होता. त्यामुळे सदर सर्व अतिक्रमणे हटविण्याची मागणी होती. त्यानुसार नगरपालिकेने हि अतिक्रमणे हटवली आहेत. तसेच डिचोली बाजारात आवश्यक त्या ठिकाणी फायर हायडंट बसविण्यात येणार आहे. याविषयी नगरपालिकेला ठराव घेण्याची सुचना आमदारांनी केली आहे. लवकरच सदर ठराव घेतला जाणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी दिली.