चिपळूण :
काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेने अतिक्रमणावर मोठी कारवाई करीत शहर मोकळे केले होते. मात्र आता पुन्हा अतिक्रमण वाढले आहे. मध्यवर्ती बसस्थानक, भोगाळे, पानगल्ली हाऊसफुल्ल झाली असून यामुळे वाहतूककोंडीचा त्रासही वाढत चालला आहे. असे असताना राजकीय दबावामुळे नगर परिषद केवळ किरकोळ कारवाई करताना दिसत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होताना दिसत आहे. काही महिने मागे जाता या अतिक्रमणात शहर इतके गुदमरले होते की त्याला मोकळा श्वास घेणेही कठीण बनले होते. बाजारपेठ, जुना बसस्थानक, भोगाळे, चिंचनाका, भेंडीनाका, पानगल्ली, मध्यवर्ती बसस्थानक, गोवळकोटरोड, बहादूरशेखनाका आदी भागात नियमित व्यापाऱ्यांसह अन्य व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी बस्तान मांडले होते. त्यांचे अतिक्रमण थेट रस्त्यांवर आल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले होते.
याच्या तक्रारी झाल्याने तीन महिन्यांपूर्वी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पोलीस बंदोबस्तासह मोठी यंत्रणा तैनात करून सलग तीन दिवस कारवाई करीत संपूर्ण शहर मोकळे केले. त्यामुळे महिनाभर शहराने मोकळा श्वास घेतला. यामुळे मुख्याधिकारी भोसले यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नागरिकांनी कौतुक केले. असे असताना आता नगर परिषदेच्या निवडणुकीची चाहूल लागल्याने काही बड्या राजकीय नेत्यांनी कारवाई नको म्हणून प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. याचा परिणाम म्हणून पुन्हा शहरात अतिक्रमण वाढत आहे.
सध्या मध्यवर्ती बसस्थानकसमोरील गटारावर अतिक्रमण करीत व्यवसाय थाटण्यात आला आहे. भोगाळे येथे तर पूर्वर्वीपेक्षा अतिक्रमण वाढले आहे. पानगल्लीतील परिस्थितीत गंभीर बनली असून रस्त्यातच साहित्य ठेवले जात आहे. अन्य भागातील परिस्थितीही तशीच असून अतिक्रमण केले जात आहे. असे असताना नगर परिषद केवळ हातगाड्या व लहान व्यावसायिकांवर कारवाई करीत आहे. यामुळे शहरात नाराजी पसरली असून पुन्हा सरसकट कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहरात वाढणाऱ्या अतिक्रमणावर शहरात नाराजी असतानाच सोशल मिडीयावरून प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करताना काही नागरिक टीकाही करीत आहेत. त्यामुळे हा प्रकार अधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागत असून कारवाई करावी तर राजकीय दबाव, न करावी तर टीका त्यामुळे नेमके काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
- अतिक्रमणांवर कारवाई होणारच
शहरातील अतिक्रमणाबाबत आजही सातत्याने तक्रारी येत आहेत. त्यामुळे कारवाई सुरूच आहे. अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना कायम समज देण्याचे काम अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. त्यामुळे कोणीही अतिक्रमण करू नये ते कधीही काढले जाईल.
– विशाल भोसले, मुख्याधिकारी नगर परिषद, चिपळूण
- आमच्याही पोटाचा विचार करा
एकीकडे वाढत्या अतिक्रमणाबाबत तक्रारी होत असतानाच दुसरीकडे अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांनी गुरुवारी नगर परिषद गाठली. त्यांनी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांची भेट घेत आमच्याही पोटाचा विचार करून कारवाई करू नये अशी मागणी केली. ते मुख्याधिकारी भोसले यांना भेटण्यासाठी काही तास थांबले होते. मात्र भोसले हे शासकीय कामासाठी बाहेर असल्याने त्यांची भेट झाली नाही. मात्र येत्या दोन दिवसात व्यावसायिक त्यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडणार आहेत.








