कडेगांव :
शहरातील वाढते अतिक्रमण व मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण होत असलेबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी नगरपालिकेकडे येत असल्याने कडेगाव नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग, कडेगाव यांनी पोलीस बंदोबस्तात आज सोमवारी एप्रिल रोजी शहरातील मुख्य रस्त्यांवर व रस्त्यालगतच्या फुटपाथवर अतिक्रमण निर्मुलन मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार आज शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमणे नगरपंचायतीने हटवली. या मोहिमेदरम्यान विना परवाना रस्त्यावर लावण्यात आलेले हातगाडे, जाहिरात फलक जप्त करण्यात आले.
ही मोहीम राबविण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांच्या निर्देशानुसार कडेगाव नगरपंचायत येथील जवळपास ३० कर्मचायाचे पथक नियुक्त करण्यात आले होते. कडेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बस स्थानक ते तहसील कार्यालय या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. आजच्या मोहिमेमध्ये कडेगाव नगरपंचायत मुख्याधिकारी, डॉ. पवन म्हेत्रे, निवासी नायब तहसीलदार महेश अनारसे, पोलीस स्थानक येथील पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता खांडेकर यांचेसह नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
कडेगाव नगरपंचायतीच्यावतीने यापुढील काळात अतिक्रमण निर्मुलन मोहीम सुरूच राहणार असून यापुढे कोणतीही आगाऊ सूचना किंवा इशारा न देता अतिक्रमण हटविणेत येणार आहे. तरी, शहरातील सर्व संबंधितांनी आपली अतिक्रमणे स्वतः हुन काढून घ्यावीत, असे आवाहन कडेगाव नगरपंचायतमार्फत करण्यात आले आहे. पालिकेच्या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.








