दोन दिवसांत 70 हून अधिक दुकानदारांना दिला दणका
प्रतिनिधी/ चिपळूण
नगर परिषदेने शहरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत 70हून अधिक व्यावसायिकांना दणका देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भाग मोकळे झाले आहेत. यासाठी चार पथकांनी नियुक्ती करण्यात आली असून कारवाईचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे ही मोहीम तीव्र होणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शहरात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. तरीही नगर परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे या अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सध्या तर या अतिक्रमणामुळे बाजारपेठेतून वाहने चालवणे सोडाच, साधे चालताही येत नाही. यामुळे वाहतूककोंडीचा त्रासही वाढला आहे. याच्या तक्रारी होऊ लागल्याने आता कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. यासाठी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, बांधकाम विभागाचे संदेश टोपरे, विनायक सावंत, राजेंद्र खातू, वैभव निवाते, प्रसाद साडविलकर आदींची चार पथके तयार करण्यात आली आहेत.
या पथकांनी गेल्या 2 दिवसांत शहरातील विविध भागातील 70 हून अधिक व्यावसायिकांना दणका देत त्यांची अतिक्रमणे हटवली आहेत. काहींचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बाजारपूल, मच्छीमार्केट आदी परिसरात भररस्त्यात होणारी मच्छी विक्री बंद करण्यात आली आहे. पानगल्लीतील अतिक्रमणही हटवण्यात आले आहे. यामुळे सध्यातरी काही भाग मोकळे दिसत आहेत. ही कारवाई अधूनमधून केली जाणार असल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
भाजी मंडई परिसरात मोठे अतिक्रमण
शहरातील भाजी मंडई परिसरात सध्या मोठे अतिक्रमण दिसून येत आहे. भाजी व्यावसायिक वाढले असून त्यांच्या छत्र्या रस्त्यावर आल्या आहेत, तर अनेकांनी पुन्हा कायमस्वरूपी खोके उभे केले आहेत. त्यामुळे या सर्वांवरही कारवाई होणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.









