खानापूर नगरपंचायतीच्या जांबोटी रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे खोकीधारकांवर उपासमारीची वेळ : योग्य निर्णय घेण्याची मागणी
बेळगाव : खानापूर नगरपंचायतीने नुकताच शहरातील जांबोटी फाट्यानजीक जांबोटी रस्त्यावरील काही अतिक्रमणे हटवली आहेत. या अतिक्रम हटाव मोहिमेमुळे 25 लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. जांबोटी-खानापूर रस्त्यावरील रहदारीला कोणताही अडथळा नसताना उदरनिर्वाहासाठी उभारलेली छोटी छोटी खोकी नगरपंचायतीने कुठलीही पूर्वसूचना न देता जेसीबी सहाय्याने हटविली. यामुळे 25 जणांचे लाखो रु. चे नुकसान तर झालेच आहे. तसेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नगरपंचायतीने गेल्या दोन दिवसांपासून जांबोटी रस्त्यावरील ही अनधिकृत खोकी हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. यावेळी खोकीधारकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. ज्यावेळी ही खोकी हटवण्यास सुरुवात झाली. त्यावेळी खोकीधारकांनी खोकी अन्यत्र हलवण्यासाठी थोडावेळ द्यावा, अशी कळकळीची विनंती केली होती. मात्र नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी काहीही न ऐकता जेसीबी तसेच क्रेनच्या सहाय्याने खोकी हटवली आहेत. त्यामुळे खोकीधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हातावरच्या पोटावर असलेले हे खोकीधारक हवालदिल झाले आहेत. त्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी इतर ठिकाणी जागाही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
अतिक्रमण काढण्याबाबत खरोखरच नगरपंचायतीचे कौतुकच होत आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी शासकीय जागेवर तसेच इतर ठिकाणी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झालेली आहेत. काही ठिकाणी अनधिकृत दुकानगाळे काढण्यात आली आहेत. तर सरकारी जागेवर पत्र्याचे शेड उभारून भाडोत्री देण्यात आलेली आहेत. याबाबत नगरपंचायतीने कित्येक वर्षापासून कानाडोळा केलेला आहे. काही ठिकाणी तर रस्त्यावरच अतिक्रमण करून रहदारीस मोठ्याप्रमाणात अडथळा निर्माण होईल असेच बांधकाम करण्यात आले आहे. तर कोणतीही परवानगी नसताना मोठमोठी बांधकामे शहरात झालेली आहेत. तसेच जांबोटी नाक्मयावरील खोकी काढतानाही नगरपंचायतीकडून दुजाभाव झालेला आहे. काहीजणांची खोकी जाणीवपूर्वक काढली नाहीत.
इतर अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करा
बेळगाव-गोवा रस्त्यावर मऱ्याम्मा मंदिर ते हेस्कॉमपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व रस्त्यावर विना परवाना बांधकामे व खोकी उभारली आहेत. त्याकडे नगरपंचायतीने पूर्णपणे कानाडोळा केलेला आह.s काही ठिकाणी तर कोणतीही परवानगी नसताना शेड उभारून हेस्कॉमकडून विद्युतपुरवठाही घेण्यात आलेला आहे. विद्युतपुरवठा घेण्यासाठी नगरपंचायतीचा उतारा तसेच ना हरकत पत्र लागते. या कागदपत्रांची पूर्तता न करताच कोणत्या आधारावर विद्युतपुरवठा देण्यात आला, असाही प्रश्न अनेकांनी विचारला आहे. फक्त गरीब तसेच हातावर पोट भरुन घेणाऱ्या नागरिकांवर नगरपंचायत कायमच अग्रेसर असते, अशीही प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. तर नगरपंचायतीने शहरात ठिकठिकाणी गाळे उभारुन ते भाडेतत्त्वावर दिले आहेत. मात्र गेल्या कित्येक वर्षापासून या गाळेधारकांनी मोठ्याप्रमाणात भाडे थकीत आहे. तसेच यांचा योग्य पद्धतीने लिलावही करण्यात येत नाही. शहरातील सर्वच अनधिकृत तसेच अतिक्रमण झालेल्या बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी खोकीधारकांकडून होत आहे.आमच्यासारख्या सामान्य लोकांवर कारवाई करण्यात मर्दुमकी गाजवणाऱ्या नगरपंचायत अधिकाऱ्यांनी शहरातील मोठ्या श्रीमंतांची अतिक्रमणे हटवावित, अशी मागणी होत आहे.
लेखी तक्रार आल्यानेच कारवाईचा बडगा…
याबाबत अधिकाऱ्यांना विचारल्यास यावर उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. जांबोटी रस्ता परिसरातील अतिक्रमण विरोधात इतका तातडीने कारवाई का केली, असे विचारले असता याबाबत आमच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती, असे नगरपंचायतीकडून सांगण्यात येत आहे. बालकल्याण खात्याच्यावतीने कोणतीही परवानगी न घेता बालकल्याण कार्यालयासमोरच काही दुकाने थाटून भाडोत्री देण्यात आली होती. आणि हे भाडे बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत होते. याबाबत बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारले असता हे भाडे महिला संघाच्या खात्यात जमा होत असल्याचे जुजबी उत्तर देवून वेळ मारुन नेण्यात आली. नगरपंचायतीने शहरातील सर्वच अनधिकृत तसेच अतिक्रमण झालेल्या बांधकामाबाबत योग्य निर्णय घ्यावा, आणि सामान्य जनतेला न्याय द्यावा, अशी अपेक्षा शहरवासियांतून होत आहे.









