दुकानांचे जंप, भाजीविक्रेत्यांना केल्या सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम शनिवारीही सुरूच ठेवल्याचे दिसून आले. समादेवी गल्ली, तसेच खडेबाजार परिसरात पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण हटविण्यात आले. दुकानांसमोर लावण्यात आलेले फलक व स्टॉल जप्त करण्यात आल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
मागील महिनाभरापासून शहरातील अतिक्रमण हटविले जात आहे. बऱ्याच ठिकाणी दुकानदार, तसेच फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना ये-जा करणेही अवघड झाले होते. त्यामुळे अतिक्रमण हटविणे गरजेचे होते. महापालिका आयुक्त शुभा बी. व रहदारी पोलिसांच्या सहकार्याने शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटविण्यात येत आहे.
शनिवारी समादेवी गल्ली व खडेबाजारच्या काही भागातील दुकानांसमोर लावलेले अनधिकृत फलक जप्त करण्यात आले. काही दुकानदारांनी दुकानांचे छप्पर रस्त्यापर्यंत काढले असल्याने ते देखील हटविण्याची सूचना करण्यात आली. त्याचबरोबर फळविक्रेते व भाजीविक्रेत्यांना पांढऱ्या पट्ट्याच्या आत बसण्याची सूचना करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अधिकारी व रहदारी पोलीस उपस्थित होते.









