रहदारी पोलीस-महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई : रस्ता-पदपथावरील अतिक्रमण हटवून व्यापाऱ्यांना दिली समज
बेळगाव : रहदारी पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून शहर व उपनगरातील अतिक्रमण हटविण्याचे काम सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी नाथ पै सर्कल आणि खडेबाजार शहापूर रोडवर कारवाई केली. रस्त्यावर व पदपथावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवून व्यापाऱ्यांना समज देण्यात आली. त्याचबरोबर गोंधळी गल्ली येथे गटारीवर थाटण्यात आलेल्या पानटपरी आणि स्नॅक्स सेंटरचे गाडेदेखील हटविण्यात आले. एकंदरीत अतिक्रमण विरोधात तीव्र मोहीम राबविण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून शहर-उपनगरातील रस्त्यांवर, त्याचबरोबर पदपथावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. रहदारी पोलीस व महापालिकेच्या अतिक्रमण हटाव निर्मूलन पथकाकडून साहित्य जप्त केले जात आहे. गणपत गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, मारुती गल्ली, रविवार पेठ, कांदा मार्केट आदी ठिकाणी सातत्याने बैठेव्यापारी व फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
त्याचबरोबर ज्या व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर फलक किंवा साहित्य थाटले आहे, त्यांचे साहित्य जप्त केले जात आहे. पांढऱ्या पट्ट्याच्या आत राहून व्यवसाय करण्यास सांगितले जात आहे. कारवाईत सातत्य ठेवण्यात आल्याने शहर व परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. आता गणपत गल्लीसह विविध गल्ल्या अतिक्रमण मुक्त झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस व मनपाने आता आपला मोर्चा शहापूर परिसरात वळविला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहापूरच्या बाजारपेठेला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. बुधवारी नाथ पै सर्कल आणि खडेबाजार शहापूर येथे अधिकाऱ्यांनी फेरफटका मारून रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविले. गोंधळी गल्लीत गटारीवर पानटपऱ्या आणि स्नॅक्स सेंटर थाटण्यात आले होते. त्यामुळे सदर अतिक्रमण हटविण्यासाठी यापूर्वीदेखील महापालिकेच्यावतीने पुढाकार घेण्यात आला होता. मात्र स्वत:हून पानटपऱ्या व स्नॅक्स सेंटर हटविली जातील असे सांगण्यात आल्याने तूर्तास कारवाई थांबविण्यात आली होती. मात्र अद्यापही तेथील अतिक्रमण हटविण्यात न आल्याने बुधवारी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत पानटपऱ्या आणि स्नॅक्स सेंटर हटविले.









