खडेबाजार रोड ते पांगुळ गल्ली दरम्यानच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविले
बेळगाव : रहदारी पोलीस आणि महापालिकेच्यावतीने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम बुधवारीदेखील राबविण्यात आली. खडेबाजार ते पांगुळ गल्ली दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा दुकानाबाहेर लावण्यात आलेले जाहिरात फलक व इतर साहित्य हटविण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्यात आल्याने काही व्यापाऱ्यांकडून स्वत:हूनच अतिक्रमण हटविले जात आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यासाठी रहदारी पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कंबर कसली आहे. यापूर्वीदेखील गणपत गल्ली, खडेबाजार, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली आदी ठिकाणचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. पांढऱ्या पट्याबाहेर बसणाऱ्या बैठे व्यापारी व फेरीवाल्यांना शिस्त लावण्यात आली होती. गणपत गल्लीत दुकानाबाहेर तीन फूट घालण्यात आलेली झंप हटविण्याचा प्रयत्न झाल्याने याला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला होता.
कारण शहरात मास्टर प्लॅन राबविताना गणपत गल्लीतील व्यापाऱ्यांनी कोणत्याच प्रकारची नुकसानभरपाई न घेता मास्टर प्लॅनसाठी जागा दिली आहे. त्यामुळे गटारीच्या आत व दुकानाबाहेर तीन फूट झंप व इतर साहित्य ठेवण्यास हरकत घेण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. तसेच आमदार राजू सेठ यांनी देखील या कारवाईला विरोध केला होता. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम गुंडाळण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारपासून पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी खडेबाजार रोडवरील मध्यवर्ती बसस्थानक ते दरबार गल्ली दरम्यानच्या दुतर्फा लावण्यात आलेले जाहिरात फलक व इतर साहित्य हटविले होते. बुधवारी खडेबाजार ते पांगुळ गल्ली दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा दुकानाबाहेर लावण्यात आलेले जाहिरात फलक व इतर प्रकारचे साहित्य हटवून जप्त करण्यात आले. या कारवाईवेळी व्यापाऱ्यांचा विरोध होईल, या शक्यतेने स्वत: वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त जोतिबा निकम लक्ष ठेवून होते. त्याचबरोबर महापालिका अधिकारी व उत्तर रहदारी पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.









