शासकीय जागा बळकावण्याचे तंत्र अवलंबण्याचा प्रकार : नवनियुक्त तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी ठोस कारवाई करणे गरजेचे
खानापूर : खानापूर शहरातील शासकीय जागा आणि इमारतींची दयनिय अवस्था झाली आहे. तसेच शासकीय जागेवर बिनधास्तपणे अतिक्रमण करून जागा बळकावण्याचे प्रकार घडत आहेत. याकडे महसूल खाते, तालुका पंचायत, नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सोयीस्कर कानाडोळा केलेला आहे. शहरातील सरकारी जागा, सरकारी इमारतींचा मालक कोण? असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शहरातील सरकारी जागा, न वापरात असलेल्या इमारतींची दयनिय अवस्था झाली आहे. या इमारती तालुका पंचायतीच्या मालकीच्या आहेत. तर सरकारी पड जागा या महसूल खात्याच्या मालकीच्या आहेत. मात्र या जागेवर होणारे अतिक्रमण रोखण्यात सरकारी यंत्रणा सपशेल कुचकामी ठरली आहे. याबाबत लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
शहर आणि आसपासच्या परिसरात सरकारी मालकीच्या अनेक इमारती आणि पड जागा आहेत. यापूर्वी तहसीलदार कार्यालयासह इतर कार्यालये असलेली जुने तहसीलदार कार्यालय पूर्णपणे मोडकळीस आले आहे. या इमारतीची गेल्या अनेक वर्षापासून देखभाल न झाल्याने इमारती कोसळण्याच्या मार्गावर आहेत. याच इमारतीच्या मागे महसूल अधिकाऱ्यांचे कार्यालयही आहे. तर काही तलाठी कार्यालयही या इमारतीत आहेत. तसेच जुने पोलीस निरीक्षक कार्यालयही याच परिस्थितीतून जात आहेत. तर जुन्या कोर्ट आवारातील कोर्टाची इमारतीची तिच दशा झालेली आहे. जुन्या कोर्ट आवारात अनेकांनी अतिक्रमण करून तात्पुरते शेड उभे करून दुकाने थाटली आहेत. तर काहींनी दुकाने उभारुन ती भाडेतत्त्वावर दिली आहेत. मात्र याकडे तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने ता. पं. अधिकारी आणि अतिक्रमण करणाऱ्यांचे साटेलोटे असल्याची चर्चा होत आहे. जुन्या कोर्ट आवारात मोठी जागा असून या जागेत जर नियोजन करून व्यापारी गाळे निर्माण केल्यास तालुका पंचायतला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो. आणि अनेक बेरोजगारांना येथे व्यवसायासाठी जागाही उपलब्ध होऊ शकते.
या जागेच्या बाजूला शिवस्मारकची इमारत आहे. या ठिकाणी असलेल्या काही झाडांमुळे शिवस्मारक इमारतीला धोका निर्माण झाला आहे. असे असताना तालुका पंचायत अधिकाऱ्यांना याबाबत शिवस्मारक ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी झाडे काढण्यासंदर्भात लेखी अर्ज विनंत्या करूनदेखील तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी अतिक्रमण करून उभारलेल्या दुकान गाळ्यांमुळे वनखात्याला ही झाडे हटवणे अडचण निर्माण झाली आहे. जर ता. पं. च्या अधिकाऱ्यांनी याबाबत ठोस कारवाई केल्यास शिवस्मारकाला धोकादायक बनलेली झाडे काढणे सोयीस्कर होणार आहे. मात्र कोर्ट आवारात दुकानगाळे उभारलेल्यांची आणि ता. पं. अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतले असल्याने ता. पं. अधिकारी याबाबत स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाहीत. याबाबत जि. पं. अधिकाऱ्यांनाही निवेदन देवून झाडे हटवण्यासंदर्भात मागणी केली होती. याबाबत जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी ता. पं. अधिकाऱ्यांना तातडीने याबाबत क्रम घेण्याचे आदेश दिले होते. मात्र ता. पं. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचनेकडेही दुर्लक्ष करून वेळ मारुन नेण्यात येत आहे. त्यामुळे या झाडामुळे शिवस्मारकाच्या इमारतीस मोठा धोका निर्माण झाला आहे.
शहरात लगत असलेल्या अनेक सरकारी पड जागेत काही राजकीय हितसंबंध असलेल्या काहींनी अतिक्रमण केलेले आहे. या जागा महसूल खात्याच्या मालकीच्या असल्याने या ठिकाणचे अतिक्रमण हटवून जागेचा सामाजिक उपक्रमासाठी वापर केल्यास अनेक समस्या मार्गी लागू शकतात. याबाबत काही महिन्यापूर्वी ‘तरुण भारत’मधून सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तहसीलदारानी ‘तरुण भारत’मधील वृत्ताचा उल्लेख करत दि. 27 नोव्हेंबर 2024 रोजी भूमापन अधिकाऱ्यांना सर्व्हे नं. 8 ची मोजणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र पाच महिने झाले तरी भूमापन अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीच कारवाई केलेली नसल्याचे समजते. त्यामुळे सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांचे आणि शासकीय अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे. शहरासह आसपासच्या परिसरातील सरकारी जागेवरील होत असलेले अतिक्रमण आणि सरकारी जागा बळकावण्यात येत असलेल्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन शासकीय जागांची पडताळणी करून या जागा सरकारजमा करणे आवश्यक आहे.
नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष
शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण होत असताना याकडे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे कानाडोळा केलेला आहे. काही ठिकाणी बांधकामांची परवानगी न घेता मोठ्या इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यावर बांधकामे आलेली आहेत. तसेच 40-50 वर्षापूर्वी असलेल्या बोळात तसेच काही ठिकाणी खुल्या जागेत अतिक्रमण करून दुकानगाळे निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे अतिक्रमण करणारेच मालक कोण बसलेले आहेत. याकडेही नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्याने अनेक ठिकाणी मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
तहसीलदारांनी कोणत्याही आमिषाला-राजकीय दबावाला बळी न पडता अतिक्रमणे हटवावीत
नुकतेच नव्याने तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारलेले तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी शासकीय जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाबाबत कठोर भूमिका घेऊन कोणत्याही आमिषाला तसेच राजकीय दबावाला बळी न पडता अतिक्रमणे हटवून या जागा सरकारच्या उपयोगात आणाव्यात. तसेच जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी महसूल भवन उभारुन या ठिकाणी सर्व तलाठी, महसूल अधिकारी, यासह इतर अधिकाऱ्यांची शासकीय कार्यालये केल्यास नागरिकांची चांगली सोय होणार आहे, अशी मागणी होत आहे.









