मध्यप्रदेश, आसाममध्ये सर्वाधिक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामंध्ये 13 हजार चौरस किलोमीटरपेक्षा अधिक आकाराच्या वनक्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे. हे क्षेत्र दिल्ली, सिक्कीमच्या भौगोलिक क्षेत्रापेक्षाही अधिक आहे. याबाबतचा खुलासा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालातून झाला असून हा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाला सोपविण्यात आला आहे. या अहवालानुसार मध्यप्रदेश आणि आसाममध्ये वनक्षेत्रावर सर्वाधिक अतिक्रमण झाले आहे.
भारतात 7,50,648 हेक्टर (7506.48 चौरस किलोमीटर) वनक्षेत्र अतिक्रमणाच्या अधीन आहे. हे क्षेत्र दिल्लीच्या आकारापेक्षा 5 पटीने मोठे असल्याचा दावा पीटीआयने प्रकाशित केलेल्या अहवालात करण्यात आला होता. या अहवालाची एनजीटीने दखल घेत वन मंत्रालयाला सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वनक्षेत्रांवरील अतिक्रमणचा तपशील एका निर्धारित प्रारुपात संकलित करण्याचा निर्देश दिला होता.
एनजीटीला सोपविला अहवाल
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने एनजीटीला स्वत:चा अहवाल सोपविला आहे. यात मार्च 2024 पर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 13,05,668.1 हेक्टर (13,056 चौरस किलोमीटर) वनक्षेत्र अतिक्रमणाच्या अधीन असल्याचे म्हटले गेले आहे. यात अंदमान आणि निकोबार, आसाम, अरुणाचल प्रदेश, आंध्रप्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, दादरा आणि नगर तसेच दमण आणि दीव, केरळ, लक्षद्वीप, महाराष्ट्र, ओडिशा, पु•gचेरी, पंजाब, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, झारखंड, सिक्कीम, मध्यप्रदेश, मिझोरम आणि मणिपूर सामील आहे.
अनेक राज्यांनी दिला नाही डाटा
काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अद्याप वन अतिक्रमण संबंधीचा डाटा सादर केला नसल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. यात बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल, नागालँड, दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि लडाख सामील आहे.
मध्यप्रदेशात सर्वाधिक अतिक्रमण
मंत्रालयाच्या अहवालानुसार मध्यप्रदेशात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेत सर्वाधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे. मार्च 2024 पर्यंत राज्यात 5460 चौरस किलोमीटर क्षेत्र अतिक्रमणाखाली होते. तर आसाममध्ये 3620 चौरस किलोमीटर वनक्षेत्रावर अतिक्रमण करण्यात आले आहे.
राज्यनिहाय वनभूमीवरील अतिक्रमणाचे प्रमाण
राज्य अतिक्रमण क्षेत्र (चौकिमी)
कर्नाटक 863.08
महाराष्ट्र 575.54
अरुणाचल प्रदेश 534.9
ओडिशा 405.07
उत्तरप्रदेश 264.97
मिझोरम 247.72
झारखंड 200.40
छत्तीसगड 168.91
तामिळनाडू 157.68
आंध्रप्रदेश 133.18
गुजरात 130.08
पंजाब 75.67
उत्तराखंड 49.92
केरळ 49.75
त्रिपुरा 42.42
अंदमान-निकोबार 37.42
मणिपूर 32.7









