बेळगाव, बागलकोट, गदग जिल्ह्यांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव, बागलकोट व गदग जिल्ह्याच्या हद्दीतील मलप्रभा व घटप्रभा पात्रात एकूण 777 एकर जागेवर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी सरकारला 3 वर्षांपूर्वी अहवाल सादर केला असला तरी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी या तिन्ही जिल्ह्यांमध्ये प्रतिवर्षी पुराची स्थिती उद्भवत आहे.
2019 मध्ये अतिवृष्टीमुळे महापुराचा धोका उद्भवला होता. या तिन्ही जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला होता. मलप्रभा व घटप्रभा नदी पात्रावर झालेल्या अतिक्रमणामुळेच महापुराला सामोरे जाण्याची वेळ आली होती. भूमापन खात्याने 2021-22 मध्ये सर्वेक्षण करून सप्टेंबर 2022 मध्ये बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला अहवाल सादर केला होता. नदीच्या पात्रातील अतिक्रमण हटवून त्या जागांच्या संरक्षणासाठी भिंत, रोप लागवड करणे, दगड आणून ठेवणे, ट्रिचिंग यासारखी कामे हाती घेण्यासाठी राज्य सरकारने 2.59 कोटी रुपये अनुदान दिले होते. या अनुदानापैकी 55.87 लाख रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित अनुदानापैकी बागलकोट जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर 1 कोटी, बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर 63.59 लाख, गदग जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर 40 लाख रुपये जमा केले आहेत. तरीही अतिक्रमणाची समस्या दूर झालेली नाही. बेळगाव, बागलकोट, गदग जिल्ह्यामध्ये एकूण 4593 सर्व्हे क्रमांकांचे मोजमाप झालेले आहे. यापैकी 659 सर्व्हे क्रमांकांवर अतिक्रमण झाले आहे. मलप्रभा नदीपात्रामध्ये व घटप्रभा नदीपात्रामध्ये 168 एकर जागेत अतिक्रमण झाल्याचे दिसून आले आहे. यापैकी बेळगाव जिल्ह्यामध्ये दोन्ही नद्यांच्या पात्रामध्ये 208 एकर जमिनीवर अतिक्रमण झाले असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनीच नदीपात्रातील जागेवर अतिक्रमण करून शेती व्यवसाय चालविला आहे.
नदी वाहण्याच्या मार्गात बदल
नद्यांच्या पात्रात अतिक्रमण झाल्याने दोन्ही नद्यांच्या वाहण्याच्या मार्गात बदल झाला आहे. नद्यांचे पाणी शेजारील शेतवडीत व गावांमध्ये शिरत असून शेतकरी व ग्रामस्थांना संकटाला सामोरे जावे लागत आहे. नद्या वाहण्याच्या मार्गात बदल झाल्यामुळे सर्वसाधारणपणे 1 हजार शेतकऱ्यांच्या 1363 एकर जमिनीमध्ये दोन्ही नद्यांचे पाणी शिरत आहे. काही ठिकाणी तर नद्यांचे पात्र कोरडे पडले आहे.
अतिक्रमण हटविण्यासाठी उपाययोजना हाती
पावसाळा संपताक्षणी नदीपात्रातील अतिक्रमण हटविण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी माध्यमांना दिली आहे.









