गोडोली :
अंजठा चौकातील महामार्ग पुलाखाली सातारा नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करुन सुशोभिकरण केले आहे. देशाच्या संरक्षणासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सैनिकांच्या स्मृती सदैव जागृत ठेवण्यासाठी या ठिकाणी रणगाडे, विमान, शस्त्रांच्या प्रतिकतीसह आकर्षक उद्यान उभारले आहे. मात्र याच ठिकाणी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून त्या जागा भाडेतत्वावर देण्याचा साईड बिझनेस करणाऱ्या फुटकळ दादांनी एक पत्र्याचे शेड, चायनिज गाडा टाकला आहे. पालिकेकडून या वेळीच हटविल्या नाहीत तर पुलाखाली अतिक्रमणाचा विळखा वाढेल. याविरोधात विलासपूरमधील जेष्ठ नागरिक लवकरच गांधीगिरी मार्गाने लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
आशियाई महामार्गाच्या विस्तारण होताना सातारा शहराच्या हद्दीवरुन जाताना वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अंजठा चौकात उड्डाण पूल उभारण्यात आले. शहराची हद्दवाढ झाल्यावर तिन्ही पुल सातारा नगरपरिषदेच्या हद्दीत आल्याने लाखो रुपये खर्च करून पुलाखाली आकर्षक रंगरंगोटी, सुशोभिकरण करण्यात आले. यातील अजंठा चौकातील पुलाखाली काही फुटकळ दादांनी आपल्या पंटरला पत्र्याचे शेड टाकण्यासाठी तर दुसऱ्याला चायनिज गाडा लावण्यासाठी ताकद दिली असल्याचे बोलले जाते.
सदरचे सुशोभीकरण केल्यापासून नियमित स्वच्छता आणि रखवाली करण्यासाठी कर्मचारी असताना हे शेड आणि चायनिज गाडा लावण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. तर याबाबत पालिकेत सर्व माहिती दिली असून त्यावर कारवाई केली जात नसल्याचे विलासपूर मधील जेष्ठ नागरिकांनी हप्तेगिरीचा संशय व्यक्त केली आहे.
पुलाखालील आर्कषक सुशोभीकरण झाले असून अतिक्रमण विरोधात वेळीच कारवाई न केल्यास भविष्यात अतिक्रमणाचा विळखा वाढत जाईल.
म्हणून विलासपूर मधील जेष्ठ नागरिक आता लक्षवेधी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार असल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.
- लाईट कनेक्शन अधिकृत की अनधिकृत..?
पुलाखाली अतिक्रमण करून टाकलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेल सुरू केले आहे. या हॉटेलमध्ये जोडलेले लाईट कनेक्शन अधिकृत की अनाधिकृत याबाबत कार्यक्षेत्र असलेल्या एसपी बंगल्यासमोरच्या महावितरणच्या कार्यालयात विचारणा केली असता याबाबत माहिती नसल्याचे उत्तर मिळाले. अधिकारी सुट्टीवर असून ते आल्यानंतर खातरजमा करून कारवाई केली जाईल असे कर्मचाऱ्यांनी तरुण भारतला सांगितले.








