सातारा :
सातारा नगरपालिकेच्या हद्दीत करंजे येथील सिटी सर्व्हे नंबर 85 ही शासकीय मिळकत आहे. त्या मिळकतीवर अनाधिकृत अतिक्रमण, धार्मिक स्थळाच्या भिंतीचे बांधकाम केले आहे. ते निष्काषित करण्याची मागणी पावसाळी अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी केली आहे.
सोलापूर शहरचे आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात सातारा शहरातील करंजे परिसरातील लक्षवेधी मांडल्याने चर्चेचा विषय बनला आहे. त्यानुसार सातारा पालिका प्रशासन कार्यवाही करणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.
पावसाळी अधिवेशनात सातारा शहरातील मुद्दा सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे यांनी लक्षवेधी मांडली आहे. त्यांनी मांडलेली लक्षवेधी अशी की करंजे तर्फ सातारा येथील सिटी सर्व्हे नंबर 85 संपूर्ण शासकीय मिळकत (सर्व धर्मिक मसनवटा) आहे. ही जागा बगिचा या कारणास्तव आरक्षित आहे. परंतु या जागेत काही व्यक्तिंनी शासनाच्या कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी न घेता धार्मिकस्थळ, कंपाऊंड वॉल, संडास टाकी, फौंडेशनचे बांधकाम केलेले आहे. या जागेत अनाधिकृत धार्मिकस्थळ बांधणाऱ्यांकडून इतरांना येण्यास मज्जाव होत आहे. त्यामुळे असंतोषांची भावना आहे. हे अनाधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम निष्काषित करण्याबाबत करंजे ग्रामस्थांनी 2 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सातारा नगरपालिकेकडे निवेदन दिले आहे. दि. 4 नोव्हेंबर 2019 मध्ये सातारा नगरपालिका प्रशासनाने अनाधिकृत धार्मिक बांधकाम निष्काषित करण्याबाबत नोटीस बजावली आहे. या नोटीसी विरोधात संबंधित धार्मिक स्थळाच्या विश्वस्तांकडून वक्फ न्यायालयात दाद मागितली गेली आहे. संबंधित धार्मिक स्थळाच्या विश्वस्तांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
तरीही अद्याप अनाधिकृत बांधकाम निष्काषित करण्याबाबत पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्याबाबतची लक्षवेधी क्रमांक 2033 मांडली आहे. तरी बांधकाम निष्काषित करण्याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.








