अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे : अतिक्रमण करणाऱ्यास पाठीशी घालण्याचा प्रकार, जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज
खानापूर : खानापूर शहराला लागून असलेल्या हलकर्णी ग्राम पंचायत क्षेत्रातील बेळगाव, तालगुप्पा महामार्गाशेजारील जागेत एकाने अतिक्रमण करून विनापरवाना जागेत मुरुम टाकून जागा सपाटीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू केले आहे. याकडे हलकर्णी ग्राम पंचायत आणि तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे. अतिक्रमण करणाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रकार असून याबाबत तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. खानापूर शहरालगत असलेल्या आसपासच्या सरकारी व इतर जागेत अशा अनेकांनी अतिक्रमण करून जागा हडप करण्याचे प्रकार गेल्या काहीवर्षापासून सुरू आहेत. याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून कारवाई करण्याची गरज आहे.
खानापूर शहरालगत असलेल्या हलकर्णी ग्राम पंचायत क्षेत्रातील बेळगाव-तालगुप्पा महामार्गालगत असलेल्या केएलई महाविद्यालयाला लागून असलेल्या जागेत एकाने परवानगी नसताना टिप्पर आणि जेसीबी लावून दिवसाढवळ्या माती टाकून जागा सपाटीकरणाचे काम सुरू केले आहे. याबाबत हलकर्णी ग्रा. पं. अधिकाऱ्यांना विचारले असता सदर जागा आमच्या अखत्यारित येत नसून ही जागा महसूल खात्याच्या अधिकाराखाली येत असल्याचे सांगून हात वर करण्यात आले आहेत. खानापूरचे महसूल अधिकारी आणि तलाठी यांना याबाबत विचारले असता सदर जागा ही गायरान कमिटीकडे असल्याचे सांगून वेळ मारून नेण्यात आली आहे. याबाबत गायरान कमिटीच्या काही सदस्यांना विचारले असता ही जागा खानापूर गायरान कमिटीच्या नावे नसून आम्ही याबाबत काहीही करू शकत नाही. असे सांगितले. सदर जागा सरकारी पड असल्याचे समजते. सदर जागा सर्व्हे क्र. 9 मध्ये येत असून महसूल अधिकाऱ्यांच्या अंतर्गत ही जागा येत असल्याने महसूल खात्याने याबाबत कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र याकडे खानापूर महसूल अधिकारी आणि तलाठी तसेच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या जागेत यापूर्वी हलकर्णी येथील काही समाजाच्या लोकांची स्मशानभूमी होती. या ठिकाणी असलेली थडगी सपाटीकरण करताना उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. याबाबतही काही जणांनी आक्षेप घेतला असता ही जागा खरेदी केल्याचे सांगून दमदाटी करण्यात आली असल्याचे समजते. याबाबत महसूल अधिकारी शशिकांत टक्केकर यांना विचारले असता याबाबत आपण निश्चित पुढील क्रम घेऊ असे सांगून वेळ मारून नेण्यात येत आहे.
सपाटीकरण करण्यात येत असलेली जागा महामार्गालगत असून खानापूर न्यायालयासमोर तसेच केएलई महाविद्यालयाला लागूनच असल्याने ही जागा सपाटीकरण करण्यात येत असल्याने ही जागा मालकीचीच असल्याचे भासविण्यात येत आहे. मात्र सदर जागा ही सरकारी पड असल्याचे समजते. मात्र महसूल विभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. खानापूर शहराच्या आसपास तसेच महामार्गालगतच्या अनेक सरकारी जागेत अशाच प्रकारे अतिक्रमण करून पत्र्याचे शेड उभारून व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी शेड उभारून भाडेही आकारण्यात येत आहे. मात्र या सर्व प्रकाराकडे महसूल तसेच नगरपंचायतीने आणि तालुका पंचायतीने दुर्लक्ष केले आहे. यामध्ये अधिकाऱ्यांचे हीतसंबंध गुंतल्याचीही चर्चा आहे.









